|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात 7 देशांचा संयुक्त लष्करी सराव 10 ते 16 सप्टेंबरदरम्यान ‘मिलेक्स 2018’चे आयोजन

पुण्यात 7 देशांचा संयुक्त लष्करी सराव 10 ते 16 सप्टेंबरदरम्यान ‘मिलेक्स 2018’चे आयोजन 

ऑनलाईन टीम / पुणे

बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल ऍण्ड इकॉनॉमिक कार्पोरेशन (बिमस्टेक) संघटनेतील सात देशांचा संयुक्त लष्करी सराव होणार असून, पुण्यातील औंध मिलट्री स्टेशन येथे 10 ते 16 सप्टेंबरदरम्यान ‘मिलेक्स-2018’ चे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित सर्व देशांच्या लष्करप्रमुखांची 15 सप्टेंबरला कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनिअरिंग येथे एकत्रित परिषद होणार असून, त्याकरिता लष्करप्रमुख बिपीन रावत उपस्थित राहणार आहेत. तर समारोप कार्यक्रमास संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत सोनी म्हणाले, या लष्करी सरावाचा प्रमुख हेतू ‘उपनगरी भागातील दहशतवादी कारवायांना आळा घालणे’ हा आहे. यामध्ये भारत, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान, म्यानमार आणि थायलंड या देशातील प्रत्येकी पाच लष्करी अधिकारी आणि 25 ज्युनिअर कमिशन अधिकारी सहभागी होणार आहेत. यंदा तांत्रिक अडचणीमुळे थायलंड देशातील निरीक्षक केवळ सहभागी होणार आहेत. भारताचे माजी राजदूत जी. पार्थसारथी हे संयुक्त लष्करी सरावावर निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. दहशतवादी कारवाईविरोधात संयुक्त लढाई कशाप्रकारे असावी, याबाबतच्या नियोजनाची आखणी, विविध देशातील जवानांची एकत्रित सांघिक बांधणी, अत्याधुनिक शस्त्रांची हाताळणी व प्रशिक्षण, अनुभवांची देवाण-घेवाण आदी गोष्टींवर संयुक्त लष्करी सरावात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बीमस्टेक देशात जगाच्या एकूण 22 टक्के लोकसंख्येचे वास्तव्य असून हा परिसर दहशतवादी कारवायांपासून कशाप्रकारे मुक्त राहून विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, याकरिता या लष्करी सरावाचा उपयोग होईल. केरळ राज्यात आलेल्या महापुराप्रसंगी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या जवानांनी जीवाचे रान करून लोकांचे प्राण वाचवले. पाच-पाच दिवस ओल्या कपडय़ानिशी सैनिकांनी तहान-भूक हरपून दिवस-रात्र अतुलनीय काम केले. अजूनही लष्कराची दोन पथके काम करत असून, त्याठिकाणची परिस्थिती सुधारल्यानंतर थोडयाच दिवसात परततील. संबंधित घटनेनंतर लष्कराच्या आप्तकालीन परिस्थिती कामात अनेक प्रकारच्या सुधारणा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापुढील काळात लष्कराच्या तुकडीत सॅटेलाइट फोन समाविष्ट केला जाणार आहे. तसेच ड्रोन कॅमेरा आणि मोठय़ा आवाजाच्या लाउडस्पीकरचाही वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या मनुष्याचे प्राण वाचवणे महत्त्वाचे असल्याने त्यादृष्टीने बचाव कार्याच्या प्रत्येक तुकडीत एक वैद्यकीय अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.