|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कळतय पण वळत नाही!

कळतय पण वळत नाही! 

समलैंगितेबाबत असलेल्या घटनेतील 377 व्या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करायचे की नाही, याबाबत समाज व्दिधा मनःस्थितीत आहे. कायद्याने व्यक्तीची प्रतिष्ठा आणि त्याचे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे असे म्हटले असले, त्याच्या लैंगिकतेच्या बाबतीत कोणीही बाहेरून बंधने लादणे गैर मानले असले तरीही हे म्हणणे खुलेपणाने मान्य कसे करायचे, हा त्यांच्यापुढचा प्रश्न आहे. वर्षानुवर्षे समलैंगिता हा कुचेष्टाचा विषय ठरलेला असल्याने आणि याबाबतीत समलैंगिक व्यक्तीची बाजू घेणाऱयाला समाजात वेडय़ात काढले जाण्याचीच भीती असल्याने, व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मानणाराही याबाबत खुलेपणाने बोलेलच असे नाही. अगदी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असला तरीही! काळ बदलला आहे आणि बदलत्या काळात धारणांनाही अधिक स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे हे समाज जाणत असला तरीही, वर्षानुवर्षांची सवय अशी एकदम तुटणार नाही. नेहरूंना स्वातंत्र्याच्या आरंभीच्या काळीच अनेकांनी समान नागरी कायद्यावरून वारंवार छेडले होते. तेव्हा त्यांनी, आपला देश नव्यानेच स्वतंत्र झालेला आहे. त्याला सर्वच बदल अचानक स्वीकारणे शक्य होईल असे नाही. अनेक सुधारणा समाजाने मान्य करण्यासाठी तसा काळ यावा लागेल असे म्हटले होते. समलैंगिकता हा गुन्हा नाही हे मान्य करण्याचा काळ सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयातून आणलेला आहे. अर्थात भारतातील जनजीवनावर प्रभाव टाकणाऱया विविध घटकांना आजही व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा हा विषय पचनी पडेल असे नाही. मुळात समलैंगिकतेला गुन्हा मानणारा व्हिक्टोरिया ऍक्ट दीडशे वर्षे जुना आहे जो ख्रिश्चन विचारांवर आधारित होता. इस्लामिक राष्ट्र असलेल्या इराणसह 75 राष्ट्रांमध्ये समलिंगी संबंधाला मृत्यूदंडाची शिक्षा आहे. भारतात हिंदू धर्मात याबाबत अनेक कथानके असली तरी रा. स्व. संघाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येताच समलैंगिकता ही अनैसर्गिक असल्याचे म्हटले आहे. यावरून तीन प्रमुख धर्मांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका घेणाऱया घटकांची याविषयीची मानसिकता किंवा विचार काय आहेत हेही स्पष्ट होते. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर समलैंगिक व्यक्ती आणि त्यांच्या संघटनांनी जल्लोष करतानाच विरोधाचीही एक बाजू समाजात कायम राहणार आहे. कदाचित नजीकच्या काळात याबाबत कायदा दुरूस्तीची मागणी होण्याचीही शक्यता आहे. मात्र काहीही असले तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या पीठाने समाजातील एका विस्थापित वर्गाला ठामपणाने निर्णय घेत आधार दिलेला आहे हे मात्र निश्चितच. मराठी भाषेत या विषयावर अनेकदा चर्चा घडलेली आहे. आनंद यादव, राजन गवस या लेखकांच्या लेखणीतून हा विषय मांडला गेला. पुढे त्यातूनच अनुक्रमे ‘नटरंग’ आणि ‘जोगवा’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. समाजाने या दोन्ही चित्रपटांनाही डोक्यावर घेतले. त्या कादंबऱयाही मराठीत लोकप्रिय होत्या. याचाच अर्थ समाजाला त्या कथानकातील नायक आणि नायिकेविषयी सहानुभूती होती. त्यांच्या शेवटाबाबत हळहळही व्यक्त केली गेली. मात्र त्यांच्याबाबतीत ठाम भावना मराठी वाचक किंवा दर्शक व्यक्त करू शकलेला नाही.  कारण वर्षानुवर्षे समाजात या विषयाला तुच्छतेनेच पाहिले गेले. हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि अशा व्यक्तीबाबत आपले एक धोरण असले पाहिजे, त्याला जगण्याचा हक्क असला पाहिजे, समाजात त्याला स्थान असले पाहिजे आणि त्याच्यासारख्याच व्यक्तीसोबत त्याला जगता आले पाहिजे हे आपण सहज मान्य करत नव्हतो. आता सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रत्येकाला ठाम निर्णय घेण्यासाठी कायद्याचा आधार दिलेला आहे. समलैंगिकता ही अनैसर्गिक आहे, त्यातून एड्सचे रूग्ण वाढतील अशी शक्यता डॉ. सुब्रम्हण्यमस्वामी यांच्यासारख्या व्यक्तीने व्यक्त करणे स्वाभाविकच होते. पण, काळ बदलला आहे आणि बदलत्या काळानुसार कायदाही अधिक व्यापक होत जाणार हे तर स्पष्टच आहे. समाज काही गोष्टी स्वीकारायला उशीर लावतो. कट्टरवादी तर त्याहून अधिक काळ घेतात. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल होऊ नये असे मानणारे आणि तशी ठाम भूमिका न्यायालयात मांडणारे लोक आजही आहेत. पण, तरीही देशातील मुस्लिम महिला आणि मोठय़ा प्रमाणावर मुस्लिम कुटुंबांचा तिहेरी तलाकला विरोध आहे. याबाबतीत आंदोलने शहाबानो काळात झाली. मात्र त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही राजीव गांधी सरकारने कायदय़ात बदल करून घेतला. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने शायराबानोच्या प्रकरणात दिलेल्या निकालानंतर परिस्थिती बदलली. कारण तिहेरी तलाकचे चटके मुस्लिमांच्या घराघरात सोसले गेले होते. मुस्लिम स्त्रीला माहेरच्या इस्टेटीत वाटय़ाच्या बाबतीतही तसेच आहे. मात्र हिंदू कुटुंबात जसे कायद्याने मुलीला हक्क मिळू लागले तसे मुस्लिम कुटुंबांनीही ते मान्य केले आणि हा बदल आपोआप घडत गेला. समलैंगिकतेच्या बाबतीत विचार करतानाही हा विचार लक्षात ठेवला पाहिजे. घटना वेगवेगळय़ा असल्या तरी त्यामागील विचार हा व्यक्तीच्या स्वातंत्र्याचाच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. देशातील समाज जसजसा सुशिक्षित होत चालला आहे. संस्कृती आपले मिश्र स्वरूप अधिक गडद करत चालली आहे तसतसे स्वातंत्र्याच्या प्रारंभीच्या काळातली सामाजिक स्थिती बदलत चालली आहे. या बदलत्या काळाचा विचार आणि गरज लक्षात घेतली पाहिजे. या बदलांना समाजाने सामोरे गेले पाहिजे. भविष्यात त्यातील दोषही पुढे येणारच आहेत आणि याच सामंजस्याने समाज तेही बदल स्वीकारणारच आहे. त्यामुळे आतापर्यंत कळते पण वळत नाही अशी असलेली भूमिका सोडून समलैंगिकतेच्या बाबतीत आपली मने खुली करावीच लागतील. कायद्याने आपले काम केले आहे, आता प्रत्येक व्यक्तीने हा विचार स्वीकारला पाहिजे.