|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारत जगासाठी स्टार्टअप हब

भारत जगासाठी स्टार्टअप हब 

पंतप्रधानांचे प्रतिपादन : ग्लोबल मोबिलिटी परिषदेचे अनावरण : कोंडीमुक्त वाहतूक व्यवस्थेवर भर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहतुकीच्या क्षेत्राकरता शुक्रवारी नवी कार्ययोजना मांडली आहे. या कार्ययोजनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीतील गुंतवणूक आणि प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. कोंडी आणि गर्दीमुळे पर्यावरण तसेच अर्थव्यवस्थेला होणारे नुकसान कमी करण्यासाठी कोंडीमुक्त वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारत सध्या स्टार्टअपचे जागतिक केंद्र ठरल्याचा दावा त्यांनी केला.

भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी ठरली असून देशात 100 स्मार्ट शहरांची उभारणी होतेय. रस्ते, विमानतळ, रेल्वेमार्ग आणि बंदरांचे निर्मितीकार्य वेगवान ठरले आहे. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी स्वच्छ ऊर्जेने संचालित परिवहन व्यवस्था सर्वात शक्तिशाली अस्त्र ठरू शकते, असे मोदींनी जागतिक मोबिलिटी परिषद ‘मूव्ह’चे अनावरण करताना म्हटले.

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर

आता कारच्या पुढे आमचा विचार गेला पाहिजे. कार वगळून अन्य वाहनांबद्दल आता विचार केला जावा. आमच्या वाहतूक सुविधेत सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला महत्त्व मिळावे. खासगी वाहनांचा चांगला वापर होण्याची गरज आहे. वाहतुकीची व्यवस्था सुरक्षित, स्वस्त आणि समाजाच्या सर्व घटकांना उपलब्ध व्हावी. चार्जिंग आधारित वाहतूक व्यवस्थेतच भविष्यातील मार्ग आहे. याकरता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती, बॅटरीपासून स्मार्ट चार्जिंग समवेत संपूर्ण साखळीत गुंतवणूक वाढण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले.

वाहतूक क्षेत्र महत्त्वाचे

प्रवासाकरता खासगी वाहनाऐवजी सार्वजनिक परिवहनला प्राधान्य मिळेल हे सुनिश्चित करण्याची गरज आहे. इंटरनेटद्वारे चालणारी संयुक्त अर्थव्यस्था आज वाहतुकीच्या क्षेत्रात विकसित होतेय. ये-जा, प्रवास करणे परिवहन अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे. उत्तम वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवास आणि परिवहनाचा भार कमी होतो आणि आर्थिक विकासाला चालना मिळते. वाहतूक क्षेत्राचा रोजगारातील वाटा अगोदरच अधिक असून नवी पिढी देखील यातून उपजीविका प्राप्त करू शकते, असे ते म्हणाले.

महामार्ग प्रकल्पांना वेग

रालोआ सरकारच्या काळात महामार्गांच्या बांधणीचे कार्य दुप्पट वेगाने होत आहे. ग्रामीण रस्ते निर्मिती कार्यक्रम नव्या ऊर्जेसह पुढे जातोय. इंधनाच्या दृष्टीने सक्षम आणि स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. याचबरोबर कमी हवाई सुविधा असणाऱया क्षेत्रांमध्ये स्वस्त विमानोड्डाण सेवा वाढविली जात असल्याचा दावा मोदींनी केला आहे. गेल्या काही वर्षात महामार्गांचे जाळे विस्तारले आहे. 

प्रदूषणरहित व्यवस्था

‘स्वच्छ किलोमीटर’चा विचार पुढे नेण्याची गरज असून प्रदूषणरहित स्वच्छता परिवहन व्यवस्थेमुळे आमचा निसर्ग, हवा स्वच्छ होईल आणि आमच्या लोकांचे राहणीमान देखील उंचावेल. भविष्यातील वाहतुकीच्या साधनांबद्दल माझा विचार 7 ‘सी’वर आधारित आहे. ‘कॉमन (संयुक्त), कनेक्टेड (जोडले गेलेले), कन्विनियेंट (सुविधापूर्ण), कंजेशन फ्री (कोंडीमुक्त), चार्जर्ड, क्लीन (स्वच्छ), कटिंग एज (अत्याधुनिक) हे 7 सी असल्याचे मोदी म्हणाले.