|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नोकरीचे आमिष दाखवून पाच तरुणांना फसविले

नोकरीचे आमिष दाखवून पाच तरुणांना फसविले 

प्रतिनिधी/ सोलापूर

राज्यातील नामवंत अशा रयत शिक्षण संस्थेत शिक्षक व शिपाई म्हणून नोकरी लावण्याचे अमिष दाखवून सोलापुरातील 5 जणांची 11 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक पुण्यातील दांम्पत्याने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

            किशोर तानाजी चव्हाण (रा. ओम आर्केटिक सोसायटी, भारती विद्यापीठ, कात्रज, पुणे) असे फसवणूक करणाऱया इसमाचे नाव आहे. किशोर आणि फिर्यादी नागनाथ सुभाष क्षीरसागर (वय 48, रा. शिवाजी नगर, बाळे, सोलापूर) यांची मैत्री होती. यातून त्यांचे मित्रत्वाचे संबंध वाढत गेले. दरम्यान, आरोपी चव्हाण याने राज्यातील नामवंत रयत शिक्षण संस्थेत शिक्षक आणि क्लार्क या पदाची भरती होणार आहे. डी. एड शिक्षण घेतलेले व नोकरीची गरज असलेल्याचे काम करु, असे क्षीरसागर यांना सांगितले. त्यावर डीएडचे शिक्षण घेऊन बसलेला भाऊ गोरखनाथ सुभाष क्षीरसागर व पुतणी पूजा यशवंत क्षीरसागर यांना नोकरीची संधी चालून आल्याने नागनाथ क्षिरसागर यांनी आरोपी चव्हाणकडे नोकरीसाठी बोलणे केले.

  याबाबत प्रत्येकी 2.5 लाख असे दोघांचे मिळून सन 2015 मध्ये 5 लाख रुपये चव्हाणला दिले. यानंतर काही दिवसांनी चव्हाण याने क्षीरसागर यांना फोन करुन भाऊ गोरखनाथ आणि पुतणी पूजा यांचे काम होत आले आहे. आणखी कोणी गरजू असल्यास सांगा असे म्हणून सांगितले. यानंतर क्षीरसागर यांनी डीएड करुन बेरोजगार असलेले सत्तु दगडू भोसले, अनिता आत्माराम चव्हाण तर शिपाई पदासाठी सुरज रामचंद्र धेत्रे यांच्यासह 7 जणांनी आरोपी चव्हाण व त्याच्या पत्नीच्या बँक खात्यावर वेळोवेळी रक्कम भरली.

  दरम्यान, नोकरीच्या कामासाठी चौकशी केली, त्यावर थोडय़ाच दिवसात काम होईल असे सांगून चव्हाण याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. पुढे आणखी काही दिवसानीं आरोपीची पत्नी अर्चना यांनी काम होण्यास विलंब होत असून, घर विक्री करुन नोकरीसाठी घेतलेले पैसे परत करण्याचे सांगून तशी वचनचिठ्ठीही लिहून दिली. मात्र तीन वर्षानंतरही आरोपी चव्हाण याने पैसे परत न करता फसवणूक केल्याचे लक्षात आले. याबाबत नागनाथ क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन किशोर चव्हाण व त्याची पत्नी अर्चना चव्हाण यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने करीत आहेत.

कोण आहे किशोर चव्हाण?

नोकरीचे आमिष दाखवून सोलापुरातील बेरोजगार तरुणांची फसवणूक करणारा आरोपी किशोर चव्हाण हा मुळचा सातारा जिह्यातील रहिमतपूरचा रहिवाशी आहे. गावाकडे बागायत शेती असून त्याच्या घरात सावकारीचा व्यवसाय असल्याचे समजते. पुण्यात आल्यानंतर त्याने एलआयसी कंपनीत काही वर्षे काम केले. त्यानंतर त्याने ओळखी सांगून लोकांना ठगविण्याचे काम सुरु केल्याचे तपासात पुढे आले आहे.