|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पेणमधील गणेशमूर्तीबाबत गोमंतकीयांना आकर्षण

पेणमधील गणेशमूर्तीबाबत गोमंतकीयांना आकर्षण 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील उत्सवी जनतेला आजही पेणहून येणाऱया गणेश मूर्तीबाबत आकर्षण आहे. ग्रामीण भागातील भक्त 2 ते 3 फूट उंचीच्या तर शहरी भागातील नागरिक 1 ते दीड फूट उंचीच्या गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात.

पणजीतील प्रेमनाथ नाटेकर हे गेली 27 वर्षे जुन्ता हाउसच्या मागे असलेल्या इडीसी परिसरात गणेशमूर्ती विकतात. ते गोव्यातील काही मूर्ती, पेण, बेळगाव व कोल्हापूर व गोकाक येथील मूर्तीही विकतात. यावर्षी वाहतूक खर्चात प्रचंड वाढ झाल्यामुळे नाईलाजाने मूर्तीच्या दरातही वाढ केली आहे. परंतु आपण जेव्हा पेण येथील गणपती मूर्ती विक्रीला ठेवतो भक्त मंडळी भराभर या मूर्ती अगोदर बूक करतात, असे नाटेकर म्हणाले.

आम्ही यावर्षी सातारा येथून देखील मूर्ती आणल्या आहेत. प्रत्येक भागातील मूर्ती बनविण्याची प्रक्रिया वेगवेगळी. कलाकुसर, कोरीव काम व आकर्षक रंगरंगोटी या साऱया प्रकारामुळे गणेशमूर्ती जास्तीत जास्त आकर्षक, रेखीव आणि उठावदार करण्याचा प्रयत्न असतो. आपण गेली 27 वर्षे पणजीत गणेशमूर्ती विकतो, आपल्याला गणेश चतुर्थी दिवशी देखील पहाटे येऊन थांबावे लागते. व दुपारी उशिरां घरी जावे लागते. गणेश भक्तांना सोयीचे होईल त्या त्यावेळी भक्त मूर्ती घेऊन जातात. आम्ही यंदा अर्ध्या फुटापासून 6 ते 6.50 फूट पर्यंतच्या गणेशमूर्ती देखील विक्रीला ठेवल्या आहेत. मडगावच्या एका मंदिराने ही 6 फूट उंचीची मूर्ती आमच्याकडून नेली आहे.

गणेशमूर्ती विक्रीचा धंदा फार अडचणीचा असतो. पेणवरून जेव्हा मूर्ती आणतो त्यावेळी एका ट्रकात जर 100 मूर्ती बसतात आम्ही केवळ 80 आणतो. ट्रकमध्ये एवढे पॅकिंग चांगले करावे लागते की गणेशमूर्तीला कुठेही मार बसता कामा नये. भक्तमंडळी प्रत्यक्षात गणेशमूर्ती घेऊन घरी जाईपर्यंत मूर्ती सुरक्षित राहावी यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. आमच्याकडे 27 वर्षे मूर्ती घेऊन जाणारे ग्राहकही आहेत, असे नाटेकर सांगतात. यावर्षी आम्ही सातारा येथून मूर्ती आणलेल्या असून बेळगावच्या गणेशमूर्तीना देखील गोव्यात चांगली मागणी आहे.

ग्राहक आज केवळ शाडू मातीच्या मूर्ती द्या असे सांगतात व त्याचबरोबर वजनाला हलक्या असलेल्या मूर्तीही मागतात. शाडूच्या मूर्ती जड असतात. जड मूर्ती म्हणजेच जास्त वजन असलेल्या मूर्ती सांभाळून घरी नेऊन पूजा करून विसर्जित करेपर्यंत भक्तांना फार मोठी कसरत करावी लागते. प्रेमनाथ नाटेकर हे पणजीतील नामवंत गणेशमूर्ती विक्रेते आहेत आणि त्यांचे म्हणणे आहे की, पेण, कोल्हापूर, बेळगावहून येणाऱया मूर्ती सुबक आहेतच. गोव्यातील कलाकारांमध्ये देखील तेवढीच चांगली कला आहे. केवळ ती पेश करण्यासाठी थोडा जादा वेळ देण्याची गरज आहे. गोव्यात खूप चांगल्या मूर्ती घडल्यास बाहेरून मूर्ती आणण्याची गरज पडणार नाही, असेही नाटेकर म्हणाले.