|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गुजराथकडे जाणारी सहा लाखाची दारु जप्त

गुजराथकडे जाणारी सहा लाखाची दारु जप्त 

इंडिका कार, ट्रकसह दोन संशयित ताब्यात : भरारी पथकाच्या एकाच रात्रीत दोन कारवाया

प्रतिनिधी / ओरोस:

 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस येथील भरारी पथकाने एकाच रात्रीत बिबवणे व पणदूर या राष्ट्रीय महामार्गावरील दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत 5 लाख 87 हजार 400 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली. या कारवाईत दारु वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इंडिका कार आणि ट्रक अशी दोन वाहनेही जप्त करण्यात आली असून कार चालक राजेंद्र खेचरे (41) आणि ट्रक चालक जीवनभाई चौहान (38) या गुजरात येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.

 इंडिका कार क्रमांक एम. एच. 23 – ई – 9002 आणि 10 चाकी ट्रक क्रमांक जी जे – 03 – बीवाय – 8904 मधून गोवा बनावटीची बिगरपरवाना दारु वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱयांना मिळाली होती. आयुक्त अश्विनी जोशी यांच्या आदेशानुसार अधीक्षक वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक यू. एस. थोरात, दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, जवान रमाकांत ठाकूर, शिवशंकर मुपडे, हेमंत वस्त, मानस पवार यांच्या पथकाने मध्यरात्रीपासून पाळत ठेवली होती.

रात्री दोन वाजता बिबवणे येथे इंडिका कार तपासणीसाठी थांबविण्यात आली. यामध्ये 1 लाख 44 हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. ही दारू आणि इंडिका कार मिळून एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील कारवाईनंतर पहाटे 5.30 वाजता पणदूर येथे सापळा रचून संशयास्पद स्थितीतील दहा चाकी ट्रक तपासणीसाठी थांबविण्यात आला. यामध्ये दारुच्या बाटल्यांनी भरलेले 70 बॉक्स आढळून आले. 4 लाख 43 हजार 400 रुपयांच्या या दारुसह 12 लाख रुपये किंमतीचा ट्रकही जप्त करण्यात आला. गोवा येथून गुजराथ राज्यात ही चोरटी दारू वाहतूक होत असल्याची बाब समोर आल्याने दोन्ही संशयितांवर बिगरपरवाना गोवा बनावट दारू वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.