|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळण्याची संधी द्या : जडेजा

तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळण्याची संधी द्या : जडेजा 

वृत्तसंस्था / लंडन

केवळ कसोटी क्रिकेट खेळण्याने आंतरराष्टीय क्रिकेट कारकीर्द बहरु शकत नाही. त्यामुळे, आपल्याला तिन्ही क्रिकेट प्रकारातून खेळवावे, अशी विनंती फिरकीपटू रवींद्र जडेजाने केली. जडेजाला सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत प्रथमच खेळवले गेले असून पहिल्या दिवशी त्याने 57 धावात 2 बळी, असे पृथ्थकरण नोंदवले. त्यानंतर तो बोलत होता.

‘ज्यावेळी आपण एकाच क्रिकेट प्रकारात खेळत असतो, त्यावेळी सामन्यांमध्ये बरेच अंतर असते आणि अशावेळी सूर सापडण्यासाठी काहीसा वेळ द्यावा लागू शकतो. पण, सध्या ज्या-ज्यावेळी संधी मिळते, त्या-त्या वेळी मैदानावर सर्वोत्तम योगदान देण्यासाठी मी पूर्ण अनुभव पणाला लावतो. संघाचा कायमस्वरुपी विश्वासार्ह सदस्य असावे, अशी माझी धारणा आहे. फलंदाजी व गोलंदाजीत सर्वोत्तम योगदान देणे, हाच माझा प्रयत्न राहिला आहे आणि यापुढेही तो राहील. अष्टपैलू खेळाडूची जागा मी समर्थपणे भरु शकतो’, असे जडेजा पुढे म्हणाला.

‘वास्तविक, खराब फॉर्ममधून जात असताना, त्यावेळी शक्य तितके अधिक सामने खेळण्याची संधी मिळणे आवश्यक असते. त्यामुळे, जितके सामने अधिक मिळतील, तितके फॉर्ममध्ये राहणे शक्य होते’, याचा त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना उल्लेख केला. इशांत व बुमराहच्या गोलंदाजीची प्रशंसा करताना तो म्हणाला, ‘आम्ही सर्वांनीच एकत्रित उत्तम गोलंदाजी साकारली. मोईन अली व कूक फलंदाजी करत असताना चौकार रोखणे, हे आमचे लक्ष्य होते. इंग्लंडमध्ये एक फलंदाज बाद झाल्यानंतर आणखी पडझड होत राहते, हे बऱयाचदा दिसून आले आहे आणि पहिल्या दिवशी याचीच पुनरावृत्ती झाली’.