|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बारा गुंतवणूकदारांची 30 लाखांची फसवणूक

बारा गुंतवणूकदारांची 30 लाखांची फसवणूक 

प्रतिनिधी/ सोलापूर

फायनान्स कंपनीच्या नवीन योजनेनुसार गुंतवणूक करणाऱया ठेवीदारास जादा व्याज दिले जाण्याचे आमिष दाखवून फायनान्स कंपनीच्या तत्कालीन शाखा प्रमुखाने शहरातील 12 गुंतवणूकदारांची 30 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

मनोहर बळवंत हलसे (वय 65, रा. बी विंग, श्रध्दा अपार्टमेंट, रेल्वे लाईन, सोलापूर) असे फसवणूक करणाऱया तत्कालिन शाखा प्रमुखाचे नाव आहे. तर नेहा पाटील, रोहिणी लोणारकर, विजय कुलकर्णी, शिवशंकर ईश्वरकट्टी, बसण्णा गणेर, रोहित कोल्हापुरे, अनंत ढेपे, नंदा जाधव, सविता मोरे, दत्तात्रय गाजरे, बाबूराव तिर्थकर व युवराज पुजारी अशी फसवणुक झालेल्या गुंतवणूकदारांची नावे आहेत.

होटगी रोड भागातील मण्णपुरम् फायनान्स कंपनीत सोने तारण ठेवून गरजुंना कर्ज देण्यात येते. या कंपनीत हलसे हे 2012 ते 2014 दरम्यान शाखा प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्या दरम्यान हलसे यांनी तक्रारदारांना कंपनीत ठेवी ठेवल्यास जादा व्याज देण्याची नवीन योजना असल्याची माहिती दिली. त्यावरुन तक्रारदारांनी हलसे यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून साधारण 25 ते 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली. प्रत्येक गुंतवणूकदारांना हलसे यांनी रिसीट व्हाउचर, व शिक्के मारुन गुंतवणूक केल्याबाबतचे बनावट सर्टिफिकेट दिले. यानंतर हलसे यांनी मुदतीनंतरची रक्कम घालून स्वत:च्या नावावर असलेले धनादेशही दिले होते. ठेवीची मुदत संपल्यानंतर गुंतवणुकदारांनी हलसे यांनी दिलेले धनादेश बँकेत भरले. परंतु, बँकेत रक्कम नसल्याने धनादेश परत आले.

गुंतवलेले पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी फायनान्स कंपनीत धाव घेऊन पैशाची मागणी केली. यानंतर कंपनीच्या नावावर लोकांकडून परस्पर पैसे घेतल्याची माहिती कंपनीला मिळाली. कंपनीचे शाखाधिकारी आणि गुंतवणूकदार यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यावर पोलिसांनी हलसे यांना बोलावून घेऊन चौकशी केली. तेव्हा हलसे यांनी गुंतवणुकदारांची रक्कम परत देण्याची हमी पोलिसांसमोर दिली होती. परंतु, गुंतवणूकदारांची रक्कम परत दिली नसल्याने व फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याने पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदारांची पोलिसांनी दखल घेतली नाही.

यामुळे ईराबत्ती नवनीत व्यंकटेश (वय 32, रा.सनसाईन टॉवर, होटगी रोड, सोलापूर) यांनी न्यायालयात हलसे विरोधात खासगी फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर हलसे विरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक करंडे करीत आहेत.

Related posts: