|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सिध्देश्वर कुरोलीत चुरशीची लढत

सिध्देश्वर कुरोलीत चुरशीची लढत 

प्रतिनिधी / वडूज

खटाव तालुक्यातील सुमारे दहा गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. यामध्ये सिध्देश्वर कुरोली, कटगुण, वर्धनगड, दरजाई, पवारवाडी, धकटवाडी, वाकळवाडी, पांढरवाडी, पोपळकरवाडी या गावांचा समावेश आहे. यापैकी काही ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध करण्यासंदर्भात गांव पातळीवर चर्चा, बैठका सुरु आहेत.

तर काही ठिकाणी चुरशीच्या दुरंगी लढती होण्याची शक्यता आहे. राजकीयदृष्टय़ा जागृत असणाऱया सिध्देश्वर कुरोली गावची निवडणूक तिरंगी ऐवजी दुरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीची आघाडी झाली असून हे दोन्ही पक्ष सिध्देश्वर परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसविरोधात एकवटले आहेत. परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सरपंच पदासाठी विजया प्रतापराव देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. तर सदस्य पदासाठी ऍड. अनुज माधवराव देशमुख, कौसल्या मोहनराव देशमुख, मनिषा दीपक देशमुख, नीलेश पोपट देशमुख, संभाजी उर्फ तुळशीदास कोंडीबा पाटोळे, गोरख गणपती बनसोडे, रुपाली प्रशांत फडतरे, रुपाली नितीन देशमुख, सोमनाथ हिंदुराव साठे, मिनाक्षी विजय काळे, मंगल बबन देशमुख, हणमंत श्रीरंग घोरपडे आादींनी अर्ज दाखल केले आहेत, त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही. अर्ज दाखल करतेवेळी राष्ट्रवादीचे माजी उपसभापती प्रा. एस. पी. देशमुख, श्रीमती शशिकला देशमुख, भाजपाचे माजी सरपंच हणमंतराव देशमुख, माजी उपसरपंच राजाराम देशमुख, युवा नेते दिपक देशमुख, सोसायटीचे अध्यक्ष किसनराव जगदाळे, ऍड. प्रकाशराव चव्हाण, माजी सरपंच राजेंद्र फडतरे, हणमंत बागल, संतोष पाटोळे, अनिरुध्द लावंगरे, अशोकराव कांबळे, सौ. मिसाळ आदिंसह युवक कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. एकंदरीत सिध्देश्वर कुरोलीत निवडणूक चुरशीची होणार आहे.