|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्लास्टिक, थर्मोकोल टाळण्याचा निश्चय करावा

प्लास्टिक, थर्मोकोल टाळण्याचा निश्चय करावा 

प्रतिनिधी/ कुडचडे

गणेशोत्सव हा गोव्यातील सर्वांत जास्त आनंदाने व उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. यंदा प्रत्येकाने पर्यावरणास पोषक अशा पद्धतीने चतुर्थी साजरी करण्याकडे लक्ष केंद्रीत करावे. यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे प्लास्टिक व थर्मोकोलचा वापर बंद करावा. ते कित्येक वर्षे झाली, तरी खराब होत नाही व मानवी जीवनाकरिता हानिकारक आहे. त्यामुळे प्लास्टिक व थर्मोकोलचा वापर टाळण्याचा दृढ निश्चय मनात करावा, असे आवाहन कुडचडे-काकोडा पालिकेचे नगराध्यक्ष फेलिक्स फर्नांडिस यांनी केले आहे.

आज सर्व ठिकाणी प्लास्टिकविरोधी मोहिमा राबविल्या जात आहेत. त्याला कुडचडेवासियांनीही हातभार लावावा व ज्या खराब होत नाहीत अशा प्लास्टिकच्या  वस्तू विकत न घेण्याचा संकल्प करावा. कारण याच वस्तू पुढे नाश करणाऱया राक्षसाचे रूप धारण करणार आहे. तोपर्यंत वेळ गेलेली असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे ते म्हणाले.

कापडी पिशव्या वाटणार

कुडचडे हे गोव्यातील पहिले प्लास्टिकमुक्त शहर करण्यासाठी चतुर्थीच्या आधी लवकरच संपूर्ण बाजारात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कागदी पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच चतुर्थीनंतर बाजारात कोठेही प्लास्टिक पिशव्या दिसू नयेत यासाठी एक लाख कापडी पिशव्या मोफत बाजारात तसेच प्रत्येक वॉर्डमध्ये घरोघरी वाटल्या जाणार आहेत. त्या बनविण्यासाठी पालिकेने स्वयंसाहाय्य गटांची मदत घेतलेली आहे. तसेच राज्यातील मोठमोठय़ा हॉटेलांतील न वापरण्यात येणारे कपडे पिशव्या बनविण्यासाठी पालिकेकडे पाठवावेत असे निवेदनपत्र पाठविले जाणार आहे, अशी माहिती फर्नांडिस यांनी दिली.

गणेश चतुर्थी थाटात व उत्साहात साजरी व्हावी हे सर्वांचे स्वप्न असते. पण सण साजरे करताना आपण जे फटाके वापरत असतो ते प्रदूषण निर्माण करत असतात. फटाके फुटल्यावर जो धूर निर्माण होतो तो धोकादायक असतो. याची तज्ञांनी याअगोदर कल्पना दिलेली आहे. खास करून नवजात बालक व जन्माला यायचे असलेले अर्भक यांच्यावर त्याचा जास्त परिणाम होत असतो. फटाके विकत घेताना या गोष्टी लक्षात घ्याव्यात. काबाडकष्ट करून मिळविलेले पैसे सदर प्रदूषणकारी फटाक्यांवर खर्च न करता चांगल्या खाद्यपदार्थांवर खर्च करावेत व गणेश चतुर्थी आनंदात तसेच प्रदूषण टाळून साजरी करावी, असे आवाहन नगराध्यक्ष फेलिक्स फर्नांडिस यांनी शेवटी केले.