|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » यंदाच्या हंगामातही खाणी सुरु होण्याची शक्यता धुसर

यंदाच्या हंगामातही खाणी सुरु होण्याची शक्यता धुसर 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील खाण व्यवसाय सुरु व्हावा म्हणून प्रयत्न सुरु असले तरी केंद्र सरकारकडे त्याबाबत पाठपुरावा होत नसल्याने यंदाचा हंगामही फुकट जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोव्यातील खाण अवलंबित खाणी सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहात असले तरी सरकारी पातळीवरुन मात्र पाठपुरावा होऊ शकलेला नाही. पंतप्रधानांची भेट घेऊन महिना उलटला मात्र प्रस्तावाचा पाठपुरावा होऊ शकलेला नाही.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्र्यांच्या गटाची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. 7 ऑगस्टला त्यांनी व अन्य तीन खासदारांनी भेट घेतली होती. या भेटीला आता महिना उलटला तरी पुढे काही होऊ शकले नाही. त्याचबरोबर पाठपुरावाही होऊ शकला नाही. राज्य सरकारने अध्यादेश व विधेयकासंदर्भातले ड्राफ्टही केंद्र सरकारला दिले आहेत. मात्र महिना उलटला तरी अध्यादेश व विधेयकांचा पाठपुरावा होऊ शकलेला नाही.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने पाठपुरावा करणे शक्य झाले नाही. खाण विषयाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी अन्य कुणाकडे नसल्याने पाठपुरावा होऊ शकला नाही. राज्य सरकारने केंद्राकडे अध्यादेश पाठविला असला तरी केंद्र सरकारकडून अध्यादेश काढून खाणी सुरु करण्याची चिन्हे दिसत नाहीत.

येत्या नोव्हेंबर महिन्यात लोकसभेचे अधिवेशन होणार आहे. या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल. एमएमडीआर कायद्यातील दुरुस्ती बरोबरच पर्यावरण दाखल्यासाठी आता वेगळी दुरुस्ती करावी लागणार आहे. कमी क्षेत्रफळाच्या लिजाना राज्य सरकार पर्यावरण दाखले देऊ शकेल अशी दुरुस्ती करावी लागणार आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खाण व्यवसायाचा अर्धाअधिक हंगाम फुटक जाणार आहे. त्याचबरोबर एकूणच सरकारचे धोरण पाहिल्यास संपूर्ण हंगामच फुटक जाण्याची शक्यता आहे.

खाण अवलंबितांचे लक्ष अध्यादेशाकडे

केंद्र सरकारने अध्यादेश काढून खाणी सुरु कराव्यात अशी मागणी खाण अवलंबित करीत आहेत. केंद्र सरकार कधी अध्यादेश जारी करते याकडे खाण अवलंबितांचे लक्ष लागून राहिले आहे. चतुर्थीनंतर खाणी सुरु होतील असे आश्वासन सरकारने दिले आहे. त्यामुळे खाण अवलंबित आतुरतेने अध्यादेश जारी होण्याची वाट पाहात आहे. सरकारवर दबाव आणून खाणी सुरु करण्यासाठी खाण कंपन्यांनी आपल्या कामगारामार्फत धरणे सुरु ठेवले आहे. खाण परिसरात आणि पणजीत अशी दोन ठिकाणी ही धरणे सुरु होते मात्र सरकारकडून पाठपुरावा होऊ न शकल्याने सध्या खाणी सुरु होण्याची शक्यता धुसर होत चालली आहे.

केंद्राकडून ठोस आश्वासन नाही

केंद्र सरकारकडून गोव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. गोव्यातील खाण व्यवसाय सुरु होणारच असे ठोस आश्वासन केंद्र सरकार किंवा मंत्र्यांच्या गटाकडून मिळालेले नाही. आतापर्यंत अनेक शिष्टमंडळे दिल्लीला जाऊन आली पण रह शिष्टमंडळाना दरवेळी हात हलवत परत यावे लागले. गोव्यात भाजपचे सरकार आहे. त्याचबरोबर तिन्ही खासदार भाजपचेच आहेत. त्यामुळे खाण अवलंबितांचे पूर्ण लक्ष सरकार आणि या तीन खासदारांच्या कृतीकडे लागून राहिले आहे.