|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » संचालकांविरुद्ध पोलीस तक्रार करा

संचालकांविरुद्ध पोलीस तक्रार करा 

म्हापसा अर्बन भागधारकांच्या बैठकीत आग्रही मागणी

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापसा अर्बनवर आरबीआयने निर्बंध लागू केल्याने ऐन चतुर्थीच्या काळात सर्वांचे पैसे अडकून पडले आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीत फक्त एकदाच केवळ 1 हजार रुपये काढता येते. येत्या मंगळवारपर्यंत खातेदारांना आपल्या खात्यातील निदान 50 हजार रुपये काढण्याची परवानगी द्यावी. बँकेचा बहुराज्य दर्जा काढावा. तसेच या बँकेवर निर्बंध लावण्यास जे संचालक मंडळ जबाबदार आहे त्या सर्वांविरुद्ध पोलीस तक्रार नोंदवावी, अशी आग्रही मागणी भागधारकांनी केली.

म्हापसा अर्बनच्या नंदादीप सभागृहात या खास बैठकीचे आयोजन केले होते. नगरसेवक राजसिंग राणे यांच्या पुढाकाराने या बैठकीत भागधारक, खातेदार व कर्मचारी मिळून सुमारे सुमारे 200 जण उपस्थित होते.

सर्वांनी यावेळी माजी अध्यक्ष रमाकांत खलप यांनाच जबाबदार धरत त्यांच्यावर रोष व्यक्त केला. स्वार्थीपणा व पॅमिलीराज यांच्यामुळेच सर्वांना या प्रसंगाला सामोरे जावे लागले. बँकेवर निर्बंध लादल्यामुळेच बँक डबघाईस आली, अशी प्रतिक्रिया सर्वांनीच व्यक्त केली.

निबंधक, आरबीआयला निवेदन देण्याचा निर्णय

या बैठकीत भागधारकांच्यावतीने सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ को ऑफ सोसायटी, मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर – नवी दिल्ली यांना पत्र लिहिले असून त्याद्वारे म्हापसा अर्बनच्या संचालक मंडळाने 4 सप्टेंबर रोजी राजीनामे सादर केले आहेत. बँक सध्या आरबीआयच्या निर्देशनाखाली पासून कार्यरत आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना संचालक मंडळाने अचानक तक्रार मागे घेतल्यामुळे आरबीआयने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे खातेदारांचे पैसे अडकले असून सर्वांचे हाल झाले आहेत. 

या प्रकरणी भागधारकांनी राज्य सरकार, आरबीआय यांनी ही बँक वाचविण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी केली. त्यामुळे सर्वांचे हित लक्षात घेऊन या बँकेवर त्वरित प्रशासक नेमावा, अशी मागणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

29 रोजी आमसभेचे आयोजन

म्हापसा अर्बन बँकेची आमसभा कायद्याने 29 रोजी होणार असून ज्या कुणाला आपल्या तक्रारी, सूचना द्यावयाच्या असतील त्यांनी लेखी स्वरुपात आठ दिवसांपूर्वी बँकेकडे सादर कराव्यात, असे यावेळी सूचविण्यात आले

निर्बंध असताना खलप कुटुंबीयाने दीड कोटी कसे काढले : शिरोडकर

200 कर्मचारी असून त्यांची परिस्थिती बिकट आहे. 35 वर्षे काम केलेल्या कर्मचाऱयांना घरी बसा म्हटले तर त्यांनी काय करावे. निर्बंध असताना खलप कुटुंबीयांनी दीड कोटी कसे काढले. संचालक मंगलदास नाईक यांनी 50 लाख रु. कसे काढले. न्यायालयात केस मागे का घेतली. यासाठी 8 लाख खर्च का केले, आमसभेपर्यंत का राहिले नाही. सर्वजण का पळाले, असे अनेक प्रश्न भागधारक किरण शिरोडकर यांनी व्यक्त केली.

सीबीआय चौकशी व्हावी : यशवंत गवडंळकर

आज बँकेच्या झालेल्या परिस्थितीला ऍड. रमाकांत खलप जबाबदार आहेत. आम्ही दोनदा निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला बाहेर काढले. खलप यांनी पत्नी, मुलाला पॅनलवर घेतले. यावर सीबीआय अथवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी म्हापसा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष यशवंत गवडंळकर यांनी केली आहे.

खलपांमुळे बँकेची वाट लागली : अभय गवडंळकर

म्हापसातील नागरिकांना सहज कर्ज मिळावे हा उद्देश होता. ऍड. मनोहर आजगावकर यांनी बँक चांगली चालली तेव्हा ही बँक खलप यांच्या हातात पडली तेव्हापासून बँकेची वाट लागली आहे, असे अभय गवडंळकर म्हणाले.

बँक वाचविण्याकडे लक्ष द्या : रिशम भूर्त

या बँकेच्या अनेक शाखा आहेत. तसेच गोव्यात फक्त 7 सहकारी बँका आहेत. परंतु म्हापसा अर्बन बँक आता बंद होण्याच्या मार्गावर असून ती बंद होण्यास देऊ नये, असे निवृत्त कर्मचारी रिशम भूर्त यांनी सांगितले.

निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी : संजय वालावलकर

पुढील भविष्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. यासाठी संचालक मंडळावर पोलीस तक्रार दाखल करावी. सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय ही बँक तारु शकणार नाही.   बँकेवर कडक प्रशासक नेमावा, अशी प्रतिक्रिया भागधारक संजय वालावलकर यांनी व्यक्त केली.

मंगळवारपर्यंत 50 हजार रु. देण्याची मुभा द्या : तुषार टोपले

सध्या बँकेतून खात्यावरील एका वेळी 1 हजार रुपये देण्यात येत आहेत. मंगळवार पर्यंत यात वाढ करून 50 हजार करण्याची मुभा द्यावी. आरबीआयने हे प्रकरण उरकून काढले आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी. अस्थायी समितीला पांठिबा देऊन या बँकेला गतवैभव मिळवून द्यावे, असे नगरसेवक तुषार टोपले म्हणाले.

राज्याबाहेरील कर्जाची चौकशी करा : शामसुंदर कवठणकर

मल्टिस्टेट बँक काढण्याची ठरली तर गोव्याबाहेर 25 कोटी कर्ज दिल्यावर राज्याबाहेरील कर्जाची वसुली करण्यास त्रास होईल, असे त्यांनी सुचवून यावर विचार व्हावा, असे प्रा. शामसुंदर कवठणकर यांनी सांगितले.