|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गणेशोत्सवाच्या तोंडावर घरफोडीचा प्रकार

गणेशोत्सवाच्या तोंडावर घरफोडीचा प्रकार 

रुक्मिणीनगर येथे कडीकोयंडा तोडून 5 लाखांच्या दागिन्यांची चोरी

प्रतिनिधी/ बेळगाव

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर शहर व उपनगरांमध्ये घरफोडय़ा वाढल्या आहेत. रुक्मिणीनगर येथे बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे 5 लाखांचे दागिने लांबविले आहेत. गुरुवारी 6 सप्टेंबर रोजी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून शनिवारी या संबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

होनगा औद्योगिक वसाहतीत कारखाना चालविणाऱया रमेश शिवानंद लोकण्णावर (वय 38, रा. रुक्मिणीनगर) यांच्या घरी चोरीचा हा प्रकार घडला आहे. 1 सप्टेंबर रोजी आपल्या घराला कुलूप घालून रमेश व त्यांची आई नातेवाईकांना भेटण्यासाठी बेंगळूरला गेली होती. गुरुवारी 6 सप्टेंबर रोजी शेजाऱयांनी घरचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून रमेश यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.

रमेश यांनी आपल्या एका नातेवाईकाला घरी पाठवून पाहणी करण्यास सांगितले. चोरीचा प्रकार उघडकीस येताच माळमारुती पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. शनिवारी 8 सप्टेंबर रोजी रमेश व त्यांची आई बेंगळूरहून परतले. तिजोरी व कपाटात ठेवलेले सुमारे 160 ग्रॅमहून अधिक सोन्याचे दागिने, कॅमेरा, मनगटी घडय़ाळे चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरटय़ांनी नेकलेस, अंगठय़ा, सोन्याचा हार, मोत्यांचे हार, कर्णफुले, लक्ष्मीपदक, मंगळसूत्र आदी ऐवज पळविला आहे. त्याची किंमत 4 लाख 87 हजार रुपये इतकी होते. माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.