|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वडगाव शिवारातील शेत जमिनीवर भू-माफियांचा डोळा

वडगाव शिवारातील शेत जमिनीवर भू-माफियांचा डोळा 

भलताच नावाचा सातबारा आणून जमीन विक्रीचा प्रयत्न

प्रतिनिधी/ बेळगाव

वडगाव आणि शहापूर शिवारात (केएलई इस्पितळ यळ्ळूर रोड) भू-माफियांची टोळी सक्रिय झाली आहे. भलत्याच नावाचा सातबारा दाखवून त्याचीच जमीन असल्याचे सांगून शेत जमिनी विक्रीचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे शिवारातील शेतकरी बांधवांनी जागृती होणे गरजेचे बनले आहे. तसेच या भागातील शेत जमिनी खरेदी करणाऱयांनीही याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांची फसवणूक होणार आहे.

यळ्ळूर रोड येथील केएलई इस्पितळासमोरील परिसरातील शेत जमिनीवर भू- माफियांचा डोळा पडला आहे. भलत्याच नावाने सातबारा आणून ही टोळी तेथील शेत जमिनी दाखवत आहेत. एखाद्यावेळेस संबंधित शेतकऱयाने याची विचारणा केल्यास शेतकऱयावरच दादागिरी दाखविण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शेतकरी बांधवातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेषत: शेतवाडीत शेतकरी बांधव नसताना ही टोळी त्याठिकाणी जाऊन जमिनीचा सौदा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे या शिवारातील तसेच परिसरातील शेतकरी बांधवांनी जागृती होणे गरजेच बनले आहे.

या आधीही अशा टोळीकडून असे प्रयत्न झाले होते. आणि काही जणांची फसवणूक ही झाली आहे. यामुळे शेतकरी बांधवांसह या भागातील शेत जमिनी खरेदी करणाऱयांनी जागृत होऊन गरजेचे बनले आहे. तसेच सर्व शेतकरी बांधवांनी मिळून या भू-माफिया टोळीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी एकत्रित येणे आवश्यक बनले आहे.