|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तीन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार तर दोघे जखमी

तीन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार तर दोघे जखमी 

प्रतिनिधी/ मोहोळ/कुर्डुवाडी 

जिह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातात तीन जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले. त्यामध्ये मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे बैलपोळा सणाच्या दिनानिमित्त शेतातील देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी भाच्यासह गेलेल्या शेतकऱयाची दुचाकी विहिरीत पडल्याले त्याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला 15 वर्षीय मुलगा विहिरीच्या कठडय़ावर पडल्याने जखमी झाला. हरिदास बाबुराव पवार (55, रा. अंकोली) असे मृत शेतकरी दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना 09 सप्टेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता तालुक्यातील अंकोली गावच्या शिवारात घडली. हरिदास पवार भाचा केशव व्यवहारे यांच्यासह नैवद्य दाखविण्यासाठी दुचाकीवरून शेतात गेले होते. दुचाकी विहिरीजवळ घसरुन तोल गेल्याने मागे बसलेला केशव विहिरीच्या कडेला पडला तर हरिदास पवार दुचाकीसह विहिरीत पडले. यामध्ये पाण्यात बुडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढून मोहोळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अरुण हरिदास पवार यांनी मोहोळ पोलिसांना माहिती दिली असून, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक महेश कोळी हे करीत आहेत. दुसरी घटना कुर्डुवाडी करमाळा रस्त्यावरील बारलोणी शिवारात घडली ट्रक व टमटम यांची धढक झाल्याने टमटम चालक ठार झाला असून दोन्ही गाडय़ांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सात रोजी घडली. पांडुरंग विक्रम गपाटे (35, रा.बारलोणी) असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. टमटम कुर्डुवाडीहून बारलोणीकडे जातअसताना समोरुन येणाऱया ट्रकने धडक दिल्याने टमटम चालक ठार झाला. याबाबत पोपट विक्रम गापाटे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून ट्रक चालक मोहम्मदमहिमुद मैनुद्दीन शेख (वय 40 रा. हैद्राबाद) याच्या विरोधात कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.   

 तर तिसऱया घटनेत इनोव्हा कार व मोटारसायकलच्या अपघातात एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. यशवंत शंकर आलदार (वय 60 रा शेरेवस्ती, वाटंबरे) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मोटारसायकल चालक संतोष शंकर पवार (वय 25) गंभीररित्या जखमी झाला आहे. रविवार नऊ सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 च्या दरम्यान सांगोला मिरज रस्त्यावर संतोष ढाब्याजवळ इनोव्हा (एम एच 13 ए झेड 5131) कारने मोटारसायकल (एम एच 45 क्यू 4899) ला जोराची धडक दिली. या अपघामध्ये यशवंत आलदार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सांतोष शंकर पवार यास मार लागल्याने त्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही वाहनाचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत मयत आलदर यांचे पुतणे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून इनोव्हा कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि अमूल कादबाने करीत आहेत.