|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » टेंभूच्या पाण्यासाठी सांगली पाटबंधारे कार्यालयासमोर बुधवारपासून ठिय्या

टेंभूच्या पाण्यासाठी सांगली पाटबंधारे कार्यालयासमोर बुधवारपासून ठिय्या 

प्रतिनिधी/ सांगोला

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यातील बुध्देहाळ तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱयांचे टेंभूचे पाणी मिळविण्यासाठी सांगली पाटबंधारे कार्यालयावर बुधवार 12 सप्टेंबरपासून ठिय्या आंदोलन होणार आहे. बुध्देहाळ तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱयांनी सांगली पाटबंधारे कार्यालयाकडे पैसे भरुनही अद्याप पाणी मिळाले नाही. 27 ऑगस्ट रोजी याभागातील शेतकऱयांनी सांगली पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली होती. साखर कारखाने, कृष्णा खोरे महामंडळ व शासन यांच्याकडील थकीत वीजबील व पाणीपट्टीमुळे टेंभूचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. तो तातडीने सुरु करुन याभागातील शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी टेंभूतून त्वरीत पाणीपुरवठा सुरु करावा. अन्यथा 12 सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, आनंदराव पाटील, बुध्देहाळ तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

  बुध्देहाळ तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी हक्काच्या पाण्यासाठी हा लढा तीव्र करणार असून, जोपर्यंत टेंभूचे पाणी मिळणार नाही. तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालूच राहील असे निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. गरज असूनही व पैसे भरुनही पाणी न मिळाल्याने बुध्देहाळ तलाव लाभधारक क्षेत्रातील शेतकऱयांचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. तरी सांगली पाटबंधारे प्रशासनाने त्वरीत दखल घेवून पाणी मागणी पूर्ण करावी. अशी मागणी श्रमिक मुक्ती दल, बुध्देहाळ तलाव क्षेत्रातील लाभधारक शेतकरी, टेंभू संघर्ष चळवळीच्या वतीने करण्यात आलेली आहे.