|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गंडा घालणाऱया भोंदूबाबाला ओंड येथे अटक

गंडा घालणाऱया भोंदूबाबाला ओंड येथे अटक 

वार्ताहर/ कराड

दैवी शक्ती व चमत्काराचा दावा करत लोकांच्या अडचणी दूर करण्याच्या नावाखाली लोकांना लाखो रूपयांना गंडा घालणाऱया ओंड (ता. कराड) येथील भोंदूबाबाला सातारा व कराड पोलिसांनी अटक केली. शंकर भीमराव परदेशी (वय 55, रा. ओंड) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव असून त्याच्याकडून रोख 39 हजार रूपयांसह 73 हजार रूपयांचे साहित्य व जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचा कर्नाटकातील असलेल्या शंकर परदेशी याने ओंड येथे आपल्या घरात  देवीचा दरबार भरवला होता. स्वत:कडे असलेल्या दैवी शक्ती व चमत्काराच्या जोरावर लोकांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन तो देत होता. मुल न होणे, नोकरीतील समस्या व घरगुती अडचणी सोडवण्यासाठी लोक मोठया संख्येने त्याच्याकडे येत होते. त्यांच्याकडून या भोंदूबाबाने लाखो रूपये उकळल्याचे समोर आले आहे.

सुनील विश्वास काळे (रा. चरण, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) हे कामधंदा मिळवण्यासाठी तसेच घरातील अडचणी दूर करण्यासाठी दोन ते तीन महिन्यांपासून या भोंदूबाबाकडे फेऱया मारत होते. शंकर परदेशीने देवीचे भागवण्यासाठी काळे यांच्याकडे 10 हजार रूपयांची मागणी केली होती. त्यानुसार काळे यांनी दुसऱयाकडून व्याजाने 10 हजार रूपये घेऊन भोंदूबाबाकडे दिले होते. मात्र पैसे देऊनही काहीच फरक पडत नसल्याने काळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दिली होती.

  अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार शनिवारी स्थनिक गुन्हे शाखा व उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने सापळा रचून शंकर परदेशी यास ताब्यात घेतले. साहाय्यक निरीक्षक विकास जाधव, पृथ्वीराज घोरपडे, प्रमोद सावंत, नीलेश काटकर, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन, विजय सावंत, सागर बर्गे, रमेश बरकडे, दीपक साठे, दीपक कोळी यांनी कारवाईत सहभाग घेतला.