|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘एका विश्रामगृहात दोन राजे’

‘एका विश्रामगृहात दोन राजे’ 

प्रतिनिधी/ सातारा

लोकसभा निवडणूका जवळ येऊ लागली असून सातारा जिल्हय़ातील राजकीय गरमागरमी वाढू लागली आहे. यंदाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजेंविरोधात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात कलगीतुरा रंगू लागला आहे. रविवारी साताऱयात जणू ‘एका म्यॅनात दोन तलवारी’ या म्हणी प्रमाणे ‘एका विश्रामगृहात, दोन राजे’ अशी प्रत्यक्ष परिस्थिती निर्माण झाल्याने काही क्षणांसाठी खळबळ उडाली. उदयराजेंची नुसती एन्ट्री झाली अन् पोलिसांनी खडाखड दारं-खिडक्या लावून घेतल्या. काही क्षणांचा झालेला हा खेळ पोलिसांचे धाबे दणाणून गेला.

 

गेल्या काही महिन्यांपासून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये चांगलेच शाब्दीक युद्ध पेटले आहे. उदयनराजे यांनी फलटण येथे जावूनही नुकतेच वक्तव्य केले होते. त्यावरुन फलटण येथूनही प्रतिवक्तव्य करण्यात आले होते. त्यामुळे हे वातावरण चांगलेच तापलेले असतानाच रविवारी दुपारीही रामराजे नाईक- निंबाळकर हे 1 नंबरच्या सुटमध्ये बसलेले असतानाच त्याच दरम्यान, खासदार उदयनराजेही शासकीय विश्रामगृहाकडे येणार असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. त्यानुसार ते आलेही. गाडीतून उतरताच शासकीय विश्रामगृहात पोलिसांसह अनेकांची एकच तारांबळ उडाली. काहीवेळ वातावरण टाईट झाले होते, परंतु काही वेळातच हे वातावरण निवळले.

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांचे अलिकडच्या काही महिन्यांमध्ये चांगलेच बिनसले आहे. दोघेही एकमेकांविरोधात जाहिर कार्यक्रमांमधून तसेच पत्रकबाजीतून एकमेकांवर टिप्पणी करताना दिसतात. नुकतेच खासदार उदयनराजे हे फलटण येथे जावून त्यांनी वक्तव्य केले होते. त्यावर रामराजेंनीही मला उदयनराजेंपासून धोका आहे. निवडणूक लढवावी लागते, अशी भितीयुक्त इच्छा व्यक्त केली होती. त्यावर उदयनराजेंनीही त्यांना साने गुरूजींचे पाढे पाठ करा, असा शाब्दीक सल्ला दिला होता. त्यावर विश्वजितराजेंनी उदयनराजेंच्या विरोधात पत्रक काढून त्यात रंग भरला हाता. चांगलेच वातावरण तापलेले असल्याने सातारा पोलिसांसह सातारकरांच्याही नजरा त्यांच्याकडे लागून राहिल्या आहेत.

रविवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात सुट नंबर 1 मध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे बसले होते. त्यामुळे त्यांना भेटायला आलेले कार्यकर्तेही बाहेरच थांबले होते. त्याच दरम्यान, खासदार उदयनराजे हेही तेथे येणार असल्याचे सातारा पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी लगेच बंदोबस्त वाढवला अन् उदयनराजे हे प्रतापगड या सुटमध्ये तडक आपल्या कार्यकर्त्यांसह गेले. तोपर्यंत काही पोलिसांनी सुट नंबर 1 चे आतून कुलूप लावले. इकडे खासदार उदयनराजे यांनी मोजक्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तोपर्यत इकडे रामराजे हे निघून गेले. त्यानंतर काही कालावधीनंतर उदयनराजे व त्यांचे कार्यकर्तेही निघून गेले. परंतु याच वेळी शासकीय विश्रामगृहातील वातावरण टाईट झाले होते.