|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » .प्रेमानंद रामाणी हे युगपुरुष व्यक्तीमत्त्व

.प्रेमानंद रामाणी हे युगपुरुष व्यक्तीमत्त्व 

खासदार नरेंद्र सावईकर यांचे उद्गार : डॉ.रामाणी यांच्या अर्धपुतळय़ाचे अनावरण

प्रतिनिधी / फोंडा

डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक पर्व घडविले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे जागतिक कार्य पाहिल्यास एका अर्थाने ते युगपुरुष ठरतात. उतारवयातही त्यांच्यातील कामाचा वेग व उत्साह पाहिल्यास चिरतरुण डॉक्टर असाच त्यांचा उल्लेख करावा लागेल असे उद्गार दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी काढले.

जगविख्यात न्युरो सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या अर्धपुतळय़ाच्या अनावरण सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डॉ. रामाणी यांच्या जगभरातील शिष्यांनी गेल्या 12 मे रोजी त्यांना हा पुतळा भेट दिला होता. डॉ. रामाणी यांचे मूळ गाव असलेल्या वाडी-तळावली येथील डॉ. रामाणी क्रीडा संकुलातील संग्रहालयात हा पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळय़ाचे काल रविवारी सकाळी  डॉ. रामाणी यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. यावेळी शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर, पत्रकार राजू नायक, डॉ. प्रेमानंद रामाणी व डॉ. आशिष चांडक आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार सावईकर यांच्याहस्ते या पुतळय़ाचे अनावरण करण्यात आले.

युवा पिढीसाठी स्फूर्तीस्थान : सुभाष शिरोडकर

डॉ. रामाणी हे युवा पिढीसाठी स्फूर्तीस्थान आहेत. त्यांच्या कार्याविषयी माहिती देणाऱया वाडी-तळावली गावातील संग्रहालयाला प्रत्येक शाळेने भेट दिली पाहिजे. डॉ. रामाणी यांनी जागतिक कीर्ती मिळवली तरी ते आपल्या गावाला विसरलेले नाहीत. आपल्या जन्मगावाबद्दल असलेला जिव्हाळा हेच त्यांचे खरे मोठेपण आहे, असे आमदार सुभाष शिरोडकर म्हणाले.

डॉ. रामाणी हे गोव्याचे आदर्श असून ते माणुसकी जपणारे डॉक्टर आहेत, असे राजू नायक म्हणाले.

डॉ. रामाणी यांची ऐंशीव्या वर्षी शंभरावी दौड

डॉ. रामाणी हे येत्या 4 नोव्हेंबर रोजी वयाच्या 80 व्या वर्षी शंभरावी मॅराथॉन शर्यत धावणार आहेत. गेल्या पंधरा ऑगस्ट रोजी मुंबई येथे सतत बारा तास धावण्यात विक्रम त्यांनी केलेला आहे. त्यांचा दिनक्रम पहाटे 4.30 वा. सुरु होतो व उतारवयातही अथकपणे काम जबरदस्त क्षमता त्यांच्यात आहे. त्यांनी वेळेचे व्यवस्थापन अचूक साधले आहे. संपूर्ण भारत आरोग्य संपन्न व्हावा हे त्यांचे स्वप्न असल्याचे डॉ. आशिष चांडक यांनी सांगितले.

कमाईतील काही वाटा समाजासाठी द्या – डॉ. रामाणी

जीवनावर प्रेम करतानाच, आपल्या जीवनाशी निगडीत प्रत्येक व्यक्ती व गोष्टीवर प्रेम करा, म्हणजे आपले जीवन सुखी होईल, असा संदेश डॉ. रामाणी यांनी दिला. आपण आयुष्यात किती धनसंपत्ती कमावली याला महत्त्व नाही. तुम्ही समाजासाठी काय दिले हे महत्त्वाचे आहे. त्यावरच तुमची श्रीमंती कळून येईल. प्रत्येकाने आपल्या कमाईतील किमान अडीच टक्के वाटा समाजासाठी द्यावा असे आवाहन डॉ. रामाणी यांनी यावेळी केले.

यावेळी कुर्टी येथील कामाक्षी उच्च माध्यमिकचे प्राचार्य परमेश्वर भट, शिरोडा आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुरा बाळे, ऍड. रामचंद्र रामाणी, क्रिकेटपटू शिवानी नाईक, कु. सिद्धी विनायक नाईक, अरविंद खांडेपारकर, डॉ. अजय वैद्य यांचा डॉ. रामाणी यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

राजेंद्र फडते व सहकलाकारांनी सादर केलेल्या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रीकुमार सरज्योतिषी व इतर ब्रह्मवृंदाच्या वेदघोषात पुतळय़ाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय वैद्य यांनी तर विनायक नाईक यांनी आभार मानले.