|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गणेश चतुर्थीचा उत्साह अन् बाजाराला आली बहार!

गणेश चतुर्थीचा उत्साह अन् बाजाराला आली बहार! 

राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये गर्दी

प्रतिनिधी/ पणजी

गणेश चतुर्थी उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे बाजारपेठा सजावटीच्या सामानाने सजल्या आहेत. गणेशमूर्तीच्या गळय़ात घालणाऱया माळांपासून विद्युत रोषणाईचे साहित्य, दारुकामाच्या साहित्याची दुकाने व मिठाईची दुकानांमध्ये आता मोठय़ा प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे.

गुरुवारी, 13 रोजी चतुर्थी उत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस आता बाकी राहिले आहेत. राज्यात सर्वत्र चतुर्थीची धावपळ सुरू असून किराणा मालाच्या दुकांनामध्येही प्रचंड गर्दी वाढू लागली आहे. राज्यातील पणजी, म्हापसा, पेडणे, डिचोली, वाळपई, वास्को, मडगाव, फोंडा, कुडचडे, सांगे, काणकोण या प्रमुख बाजारपेठा गणेश सजावट साहित्याने सजल्या आहेत. साहित्य खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढत आहे. ग्रामीण भागातील लोक खरेदीसाठी शहरी भागातील बाजारपेठांमध्ये धाव घेत आहेत.

गणेशाच्या गळय़ांतील माळांचे आकर्षण

गणेशमूर्तीच्या गळय़ात घातल्या जाणाऱया अनेक प्रकारच्या आकर्षक माळांनी सध्या बाजारपेठा व्यापून गेल्या आहेत. रंगीबेरंगी माळांच्या आकर्षक माळा लक्ष वेधून घेत आहेत. सुबक अशा गणेशमूर्तीच्या गळय़ात सजविण्यासाठी अनेक प्रकारच्या माळा उपलब्ध आहेत. फुलांचे हारही लक्ष वेधून घेत आहेत. सजावटीसाठी लागणाऱया लांबलचक बनावट फुलांच्या माळाही उपलब्ध आहेत. गळय़ातील माळांची लाखो रुपयांची उलाढाल राज्यात होते. 150 ते 400 रुपयापर्यंतच्या दराने या माळांची विक्री होत आहे.

विद्युत रोषणाईच्या सामानासाठी गर्दी

विद्युत रोषणाईच्या सामानाने बाजारपेठात झगमगाट निर्माण झाला आहे. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी विद्युत माळा, फोकस लाईट्स व अन्य प्रकारच्या सजावटीचे सामान विक्रीसाठी उपलब्ध आहे. गणेश सजावटीमध्ये विद्युत रोषणाईच्या साहित्याचा मोठा वापर होतो. त्यामुळे या साहित्याला सध्या बाजारात गर्दी दिसून येत आहे. सजावट करण्यासाठी लागणारे मखर व अन्य आकर्षक वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. स्वतःच्या पसंतीप्रमाणे लोक खरेदी करताना दिसत आहेत.

खाणबंदीचा परिणाम दिसून येतोय

राज्यात खाणी सुरू असताना खाणभागातील व्यावसायिक खरेदीसाठी पणजी, म्हापसा, मडगाव, वास्को, कुडचडे, सावर्डे या बाजारपेठांमध्ये गर्दी करायचे, मात्र मागील पाच सहा वर्षे खाणबंदीमुळे खाण परिसरातून शहरी बाजाराकडे येणाऱया लोकांची संख्या कमी झाली आहे. खाणबंदीने लोकांना आर्थिक अडचणीत आणले आहे. हातात पैसा नसलयाने त्याची खरेदी थांबली आहे. त्याचा मोठा परिणाम राज्यातील बाजारपेठावर दिसून येत आहे.

Related posts: