|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » महिला हेल्पलाईन 181 चा आज पणजीत शुभारंभ

महिला हेल्पलाईन 181 चा आज पणजीत शुभारंभ 

प्रतिनिधी/ पणजी

संकटात सापडलेल्या किंवा मदत हवी असणाऱया मुली-महिला यांना साहाय्य करण्यासाठी 181 या तीन अंकी हेल्पलाईनचा शुभारंभ आज, सोमवार 10 रोजी पणजी येथील कला अकादमीत सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे.

जीव्हीके इमर्जन्सी मॅनेजमेंट ऍण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटला (इएमआरआय) हे कंत्राट देण्यात आले असून, महिला आणि बालविकास खात्याच्या सहकार्याने सदर हेल्पलाईन चालवण्यात येणार असून ती सेवा निःशुल्क आणि टोल फ्री आहे. त्या खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते त्या हेल्पलाईन सेवेचा शुभारंभ होणार आहे.

181 या क्रमांकावर फोन करून मुलगी किंवा महिलेच्या विनंतीनुसार तिला साहाय्य मिळेल यासाठी खात्यातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. पोलीस मदत हवी असल्यास जवळच्या पोलीस स्थानकाचा क्रमांक तातडीने पुरवला जाणार असून तेथून पोलीस तिच्या मदतीला धावतील, अशी सोय करण्यात आली आहे. तक्रारीच्या स्वरुपानुसार मदत मिळवून दिली जाणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अशी हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. शिवाय तसे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले होते. गोव्यातही मुली-महिला यांच्यावरील अन्याय-अत्याचार वाढत असून अनेकवेळा त्यांना अशा प्रसंगी काय करावे, कुठे जावे हे कळत नाही. त्यांना या हेल्पलाईनवर योग्य तो सल्ला देण्यात येणार आहे. ही हेल्पलाईन गोव्यातील मुली-महिलांना दिलासा देणारी ठरणार असून त्यांना योग्यवेळी मदत मिळणार, अशी अपेक्षा त्या हेल्पलाईनच्या मागे आहे. सध्या 181 क्रमांक महाराष्ट्रात लागतो अािण आता त्याची सेवा गोव्यात उपलब्ध होणार आहे.