|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गंगाधर चडचण हत्याप्रकरणी 373 पानांचे आरोपपत्र

गंगाधर चडचण हत्याप्रकरणी 373 पानांचे आरोपपत्र 

प्रतिनिधी / विजापूर/बेळगाव

संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या गंगाधर चडचण (वय 30) हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीने पूर्ण केला आहे. दोन दिवसांपूर्वी इंडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात 15 जणांविरुद्ध 373 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महादेव सावकार भैरगोंड याला बळ्ळारी कारागृहात तर पीएसआय गोपाल हळ्ळूर याला गुलबर्गा कारागृहात हलविण्यात आले आहे.

तीन दिवसांपूर्वी अत्यंत गुप्तपणे या दोघा जणांना विजापूर येथील दर्गा जेलमधून बळ्ळारी व गुलबर्गा येथे हलविण्यात आले आहे. गंगाधर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर आता सीआयडीने कुख्यात गुंड धर्मराज चडचण (वय 32) याच्या एन्काऊंटर प्रकरणाचाही तपास सुरू केला आहे. हे प्रकरण व्यवस्थितपणे हाताळले नसल्याचा ठपका ठेऊन इंडीचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र शिरूर व नोटीस देऊनही चौकशीसाठी हजर न राहणाऱया सीपीआय एम. बी. असुदे या दोघा जणांना निलंबित करण्यात आले आहे.

30 ऑक्टोबर 2017 रोजी इंडी तालुक्मयातील कोंकणगाव येथे धर्मराजचा एन्काऊंटर झाला होता. त्याच दिवशी त्याचा लहान भाऊ गंगाधर याला पोलिसांनीच ताब्यात घेऊन प्रमुख आरोपी महादेव सावकार भैरगोंड याच्या साथीदारांकडे सोपविले होते. त्यांनी गंगाधरचा खून केला होता. धर्मराजच्या एन्काऊंटरनंतर अनेक महिने उलटले तरी गंगाधर बेपत्ता होता. गंगाधरची आई विमलाबाई चडचण हिने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या गुलबर्गा येथील न्यायपीठात हेबिएसकॉर्पस दाखल केली होती. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला होता.

सीआयडीने महादेव भैरगोंड, हणमंत पुजारी, सिद्धगोंडा तिक्कुंडी, सिद्धगोंडा मुडवी, शिवानंद बिरादार, बाशासाब नदाफ, भीमू पुजारी, चाँदहुसेनी चडचण, पोलीस सिद्धारुढ रुगी, चंद्रशेखर जाधव, गिड्डाप्पा नायकोडी, पीएसआय गोपाल हळ्ळूर, सीपीआय एम. बी. असुदे, भीमनगौडा बिरादार, सत्यगौडा पाटील या 15 जणांविरुद्ध गंगाधर चडचण हत्याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहेत. 9 जून 2018 रोजी गंगाधरच्या आईने चडचण पोलीस स्थानकात खुनाची फिर्याद दिली होती.

महादेव सावकार व गोपाल हळ्ळूर यांना विजापूर कारागृहातून बळ्ळारी व गुलबर्गा कारागृहात का हलविण्यात आले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विजापूरच्या दर्गा कारागृहातच राहिला तर महादेव सावकार साक्षीदारांवर आपला प्रभाव टाकू शकतो, या उद्देशाने त्याला हलविण्यात आले आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या तीन पोलिसांनी गोपाल हळ्ळूरची कारागृहात हजेरी घेतली आहे. तुझ्यामुळेच आमच्यावर अशी वाईट वेळ आली आहे, असे सांगत त्याला धारेवर धरल्याने त्यालाही हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

सीआयडीच्या अधिकाऱयांनी दिलेल्या सूचनेवरून या दोघा जणांना अन्य कारागृहात हलविण्यात आले आहे. सीपीआय एम. बी. असुदे हा अद्याप फरारी आहे. सीआयडीने चौकशीसाठी त्याला नोटिसा पाठवूनही तो हजर झाला नाही. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे. आता 15 जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यामुळे लवकरच या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे.

चौकट करणे

धाडसी अधिकाऱयावर निलंबनाची कारवाई

इंडीचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र शिरूर यांना निलंबित करण्यात आले आहे. उत्तर कर्नाटकातील बेळगावसह अनेक पोलीस स्थानकात उत्तम सेवा बजावून चतुराईने अनेक प्रकरणांचा छडा लावणाऱया रविंद्र यांचा या प्रकरणात कोणताच सहभाग नसल्याचे सीआयडी तपासात उघडकीस आले आहे. खरे तर सीपीआय व पीएसआयविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले आहे. मात्र, या प्रकरणाच्या तपासावर व्यवस्थित देखरेख ठेवली नसल्याचा ठपका ठेवत रविंद्र यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी भीमाकाठावरील अनेक खतरनाक गुन्हेगारांना धडकी भरेल, अशी त्यांनी कामगिरी केली आहे.