|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वियोगातही गोपी जिवंत कशा?

वियोगातही गोपी जिवंत कशा? 

भगवंताच्या पादसेवेचे व्रत लक्ष्मीने घेतले आहे. तुकाराम महाराजांचा अभंग सुप्रसिद्ध आहे-पाय लक्षुमीचे हाती । तीसी यांवे काकुळती ।। श्रीकृष्ण गोपींना म्हणतात-मी माझे चरण तुमच्या हृदयावर ठेवायला तयार आहे, पण एक भयही वाटते मला. अभिमानामुळे विषाक्त झालेल्या तुमच्या हृदयावर मी आपले चरण ठेवले आणि त्याचा परिणाम माझ्या चरणावरही झाला तर? गोपी – आपण तर आमच्या भावनेचे हसे करीत आहात. आपण तर विषारी कालिया नागाच्या मस्तकावर आरूढ होऊन नर्तन करणारे आहात. कालिया नागाच्या विषाचा तुमच्यावर काही परिणाम झाला नाही तर आमच्या हृदयातील अहंकाराचे विष आपणाला काय करू शकेल? आणि आमची हृदये विषारी असतील तर तुमचे चरण त्यावर अमृतसिंचन करतील. तुमचे चरण तर सर्वच नमस्कार करणाऱयांचे पाप नाहीसे करणारे आहेत. गोपी विनंती करतात-हे नाथ! तुमच्या अधरामृताचे पान करवून आम्हाला जीवनदान द्या. श्रीकृष्ण-तुम्ही जिवंत तर आहात तरीही कसले जीवनदान मागत आहात? मी ऐकलें आहे कीं दशरथांनी रामाच्या वियोगामुळे प्राणत्याग केला होता. हे आहे खरे प्रेम! माझ्या वियोगात तुम्ही जिवंत आहात, माझ्याशी बोलत आहात, तुमचे प्राण गेले नाहीत म्हणून मला वाटत आहे की तुमचे प्रेम खरे नाही. जर तुमचे प्रेम खरे असते तर तुम्ही दशरथाप्रमाणे प्राणत्याग केला असता.  गोपी-काय म्हणत आहात तुम्ही? आमचे सर्वांचे प्राण जातच होते; परंतु तुमच्या कथामृतपानाच्या लाभाने आतापर्यंत थांबले आहेत. तुमचे कथामृत आणि नामामृत यांनी आमचे प्राण रोखून ठेवले आहेत. तुम्ही आम्हाला भेटण्याचे वचन दिले होते. ते वचन पूर्ण होण्याच्या आशेने आम्ही जिवंत आहोत. वैष्णव तर जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत परमात्म्याला भेटण्याच्या आशेवर जगत असतो. प्रभो! तुमची लीलाकथा तर अमृतस्वरूप आहे. ती केवळ श्रवणमात्रानेच पापाचा नाश करते. तिचे श्रवण मंगल, आनंददायी आहे. (यज्ञकथा ऐकून आनंद होत नाही. विरहाकुल जीवासाठी रासलीला जीवनरूप आहे. मोठमोठय़ा ज्ञानी महात्म्यांनी, भक्त कवींनी हिचे गान आणि श्रवण केले आहे. ही कथा सर्व पाप आणि ताप नाहीसे करतेच; आणि केवळ ऐकण्यानेच परमकल्याणदेखील करते. ही अतिसुंदर, मधुर आणि शांतिदायक आहे. स्वर्गाचे अमृत तर पुण्य जाळते. पण ही कथा पाप जाळते. जो मनुष्य या लीलाकथेचे गायन करतो तोच या जगात सर्वात मोठा दानी होय. रामांनी हनुमंताला विचारले होते की जानकी त्यांच्या विरहामधे आपल्या प्राणांचे रक्षण कशी करीत राहिली आहे? हनुमंतांनी उत्तर दिले-आपले नाम रात्रंदिवस तिचे रक्षण करीत आहे. आपले ध्यान द्वार आहे, नेत्र तर आपल्या चरणांवरच लक्ष ठेवून आहेत तर मग प्राण जाईल तरी कुठून? तसे तर विरहामुळे प्राण निघूनच गेले असते. पण बाहेर जायला कोणताच मार्ग तर नाही.)