|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » उपकारांची परतफेड

उपकारांची परतफेड 

निवडणुका आल्या की आपण सामान्य नागरिक आपल्या पुढाऱयांशी फार दुष्टपणे वागतो असे माझे मत आहे. उण्यापुऱया पाच वर्षांनी भेटायला आलेल्या पुढाऱयांना प्रेमभराने मिठी मारावी, आगतस्वागत करावे, पण असं न करता आपण त्यांना विचारतो-गल्लीतलं गटार दुरुस्त का केलं नाही, रस्त्यावर खड्डे का पडले, नळाला पाणी का आलं नाही, वगैरे वगैरे. अरे, गेली पाच वर्षे त्या भागात आपण राहतोय, पुढारी आजच इथं आलाय, मग या फालतू प्रश्नांची उत्तरे त्याला ठाऊक असणार की आपल्याला? असो.

हा अन्याय दूर होण्यासाठी खालील क्रांती घडावी असे मला मनापासून वाटते –

गणेशोत्सव उंबरठय़ावर आला आहे. पूर्वी या दैवताची आराधना लोक घरातल्या घरात करायचे. सारे कुटुंब देव्हाऱयासमोर उभे राहून गणपतीची आरती करायचे. पण त्यातून आपल्या स्वरयंत्रावर खूप ताण यायचा. तस्मात आपल्या नेत्यांनी एडिसन वगैरे शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांचा वापर करून ही अडचण दूर केली. रस्त्यावर स्पीकर्सच्या भिंती उभारून त्यावर आरती लावायला आरंभ केला. त्यामुळे आपल्या स्वरयंत्रावरचा ताण संपुष्टात आला. सणासुदीला कुटुंबीयांनी आपापसात भांडू नये असे म्हणतात. स्पीकर्सवर अहोरात्र चालू असलेल्या गजरामुळे घरात एकमेकांशी बोलताच येत नाही. त्यामुळे आपापसात भांडणे देखील अशक्मय झाले. अशा रीतीने उत्सवकाळात कुटुंबे तंटामुक्त झाली. हे उपकार आपल्या नेत्यांनी केले. त्यांची परतफेड आपण करायला नको का?

ढोलपथके ही एकविसाव्या शतकाने आपल्याला दिलेली अद्भुत देणगी आहे. नदीतीरावर राहणाऱया सुदैवी नागरिकांना या ढोलवादनाचे सराव अनेक महिने ऐकायला मिळतात. विसर्जनाच्या मिरवणुकीच्या मार्गावर राहणाऱया दैववान नागरिकांना मिरवणूक अनायासे बघायला मिळते. मिरवणुकीतली रोषणाई, स्पीकर्सवरची लोकगीते, त्या गीतांच्या तालावर होणारी लोकनृत्ये आणि नाचताना कार्यकर्त्यांनी केलेले अप्रतिम हावभाव यांचा आनंद मिळतो. अनेक भाग्यवान नागरिकांच्या घरासमोर भव्य मंडप उभारलेले असतात.   

हे सारे आनंद आपल्या नेत्यांना का मिळू नयेत? त्यांच्या घराजवळ ढोलपथकांनी एखादा महिना सराव करावा, त्यांच्या घरासमोरच्या रस्त्यावर भव्य मंडप उभारावेत, उत्सव काळात त्यांना मंडपातून येणारे भक्तिगीतांचे गगनभेदी सूर रात्री दहापर्यंत ऐकायला मिळावेत, विसर्जनाच्या मिरवणुकीचा मार्ग प्रत्येक माननीय नेत्याच्या घरासमोरून नेला तर त्यांना मिरवणुकीचा आनंद लुटता येईल. हे सारे होईल तेव्हाच उपकारांची परतफेड होईल.