|Thursday, July 18, 2019
You are here: Home » उद्योग » 33 टक्के भारतीयांकडून निवृत्तीवेतनासाठी बचत

33 टक्के भारतीयांकडून निवृत्तीवेतनासाठी बचत 

एचएसबीसीचा अहवाल : आर्थिक साक्षरतेबाबत अजूनही अज्ञान

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील प्रत्येक तिसऱया व्यक्तीपैकी केवळ एकटा आपल्या उतारवयासाठी बचत करत असल्याचे सत्य समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असलेल्या लोकांपैकी 33 टक्के लोक बचत करत आहेत, असे अहवालातून समजते. निवृत्तीवेळी आपल्याला किती प्रमाणात पैशांची गरज भासेल याची याबद्दल अनेकांमध्ये अजूनही आर्थिक साक्षरता नाही. उतारवयासाठी बचत करण्यापेक्षा अनेकजण सध्या असणाऱया आपल्या इच्छा पूर्ण करण्यावर भर देत आहेत, असे एचएसबीसीच्या ‘फ्युचर ऑफ रिटायरमेन्ट : ब्रिजिंग द गॅप’ या अहवालात म्हणण्यात आले.

सध्या कमी वयात निवृत्त होण्यामध्ये वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कामकाज करणाऱया 54 टक्के भारतीयांनी कमीत कमी वेळेत निवृत्त होत नंतर काही तर काम करण्याचा निर्णय घेतला असून त्याला अर्ध-सेवानिवृत्ती असे म्हणतात. हा अहवाल तयार करण्यासाठी 16 देशातील 16 हजार लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अर्जेंटिना, कॅनडा, चीन, ऑस्ट्रेलिया, भारत, मलेशिया, मेक्सिको, सिंगापूर, तैवान, फ्रान्स, हाँगकाँग, इंडोनेशिया, तुर्कस्तान, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन आणि अमेरिकेचा सहभाग आहे.

गेल्या पिढीच्या तुलनेत आताची नवीन पिढी आपल्या पुढील पिढीसाठी काही प्रमाणात बचत करण्यावर विश्वास ठेवत नाही. त्या पिढीने स्वतःसाठी संपत्तीची निर्मिती करावी असे त्यांना वाटते. देशातील 22 टक्के लोकांचे म्हणणे असे आहे की पुढील पिढीने आपल्यासाठी संपत्ती निर्माण करावी, तर 13 टक्के लोक आपल्या पुढील पिढीसाठी काही बचत करण्याचा विचार करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही आकडेवारी अनुक्रमे 21 आणि 13 टक्के आहे. सेवानिवृत्तीनंतर 35 टक्के भारतीयांची अमेरिकेत स्थायिक होण्याची इच्छा आहे, तर 20 टक्के लोकांनी ऑस्ट्रेलिया आणि 24 टक्के लोकांनी ब्रिटनला पसंती दिली.