|Friday, April 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रुपयाचा ऐतिहासिक निचांक

रुपयाचा ऐतिहासिक निचांक 

पहिल्यांदाच 72.45 वर बंद : 72 पैशांनी कमजोर : सरकारकडून पहिल्यांदाच दखल

मुंबई / वृत्तसंस्था

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होणारे अवमूल्यन सोमवारीही दिसून आले. रुपयाने पहिल्यांदाच 72 चा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. सोमवारी सत्रातील व्यवहारादरम्यान रुपया 72.67 पर्यंत घसरला होता. बँका आणि आयातदारांकडून अमेरिकन डॉलरची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढल्याने रुपया तब्बल 94 पैशांनी कमजोर झाला होता. यामुळे सरकारकडून दखल घेण्यात आली. दिवसअखेरीस 72 पैशांनी घसरत रुपया 72.45 वर बंद झाला. 13 ऑगस्टनंतर झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. यापूर्वी 6 सप्टेंबर रोजी रुपयाने 72.11 चा निचांक गाठला होता.

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे उभरत्या अर्थव्यवस्थांवर परिणाम दिसून येणार आहे. शुक्रवारी रुपया सलग सात सत्रात होणाऱया घसरणीला लगाम लावत 26 पैशांनी मजबूत झाला होता. मात्र शुक्रवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱया वस्तूवर 267 अब्ज डॉलर्सचा कर आकारण्याची धमकी दिली. याचे परिमाण आंतरराष्ट्रीय बाजारात दिसून आले. बीएसईचा सेन्सेक्स 468, तर निफ्टी 151 अंकाने घसरत बंद झाला असून 16 मार्चनंतरची ही सर्वात मोठी उतरण ठरली आहे. देशाची व्यापार तूट, अल्पकालीन कर्जावरील व्याजावर परिणाम दिसून येण्याची शक्यता चलन बाजारातील तज्ञांकडून वर्तविण्यात आली.

सरकारकडून दखल

गेल्या काही महिन्यांपासून डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत असल्याने पहिल्यांदाच सरकारने चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांकडून विदेशात करण्यात येणाऱया खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात सरकार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱयांनी सांगितले. रुपयाच्या अवमूल्यनाबाबत अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक एकमेकांच्या संपर्कात आहेत. चलन बाजारात आवश्यकता भासत असल्यास आरबीआयकडून दखल देण्यात येत आहे. आरबीआयकडून काही प्रमाणात डॉलरची विक्री करण्यात येत आहे. भारताचा सध्याचे विदेशी चलन संकलन योग्य प्रमाणात असल्याचे अधिकाऱयाने सांगितले. एप्रिलच्या मध्यावधीस 426 अब्ज डॉलर्स असणारे विदेश चलन घसरत आता 400 अब्ज डॉलर्सवर पोहोचले.

घसरण…

– बँका, आयातदारांकडून डॉलर्सच्या मागणीत वाढ

– अमेरिका-चीनमधील व्यापारी युद्धाचा परिणाम

– बीएसईचा सेन्सेक्स 467 अंकाने कमजोर

Related posts: