|Monday, April 22, 2019
You are here: Home » क्रिडा » ज्योकोव्हिच तिसऱयांदा अमेरिकन ग्रँडस्लॅम जेता

ज्योकोव्हिच तिसऱयांदा अमेरिकन ग्रँडस्लॅम जेता 

जुआन मार्टिन डेल पोट्रोवर सरळ सेट्समध्ये मात

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हॅक ज्योकोव्हिचने रविवारी तिसऱयांदा अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली. शिवाय, पीट सॅम्प्रासच्या 14 ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी देखील साधली. त्याने अंतिम फेरीत अर्जेन्टिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोला 6-3, 7-6 (7/4), 6-3 अशा फरकाने पराभूत केले. येथे तो आठव्यांदा अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होता. यापूर्वी 2011 व 2015 मध्ये देखील त्याने या स्पर्धेच्या जेतेपदावर आपली मोहोर उमटवली होती. या स्पर्धेच्या इतिहासात राफेल नदालने त्याच्यापेक्षा 3 तर रॉजर फेडररने 6 अधिक ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवली आहेत. फेडररच्या खात्यावर सध्या 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत.

सर्बियाच्या 31 वर्षीय ज्योकोव्हिचला गतवर्षी ढोपराच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळता आले नव्हते. यंदा मात्र प्रतिकूल, उष्ण वातावरणात देखील दमदार खेळ साकारत त्याने जेतेपद खेचून आणले. विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतही तो यापूर्वी 4 वेळा जेतेपदाचा मानकरी ठरला आहे.

सध्या जागतिक मानांकन यादीत तिसऱया स्थानी असलेल्या डेल पोट्रोसाठी मात्र रविवारचा पराभव अपेक्षाभंग करणारा ठरला. येथे तो आपल्या टेनिस कारकिर्दीत केवळ दुसऱयांदाच अंतिम फेरीत पोहोचला. 9 वर्षांपूर्वी त्याने याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचत जेतेपद काबीज केले. पण, येथे त्याला जेतेपदाला गवसणी घालता आली नाही. ज्योकोव्हिचने अर्जेन्टिनाच्या पोट्रोला पराभूत करण्याची ही एकूण 15 वी व ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासातील पाचवी वेळ ठरली. या विजयासह मागील 55 प्रतिष्ठेच्या स्पर्धां इतिहासात फेडरर, नदाल, ज्योकोव्हिच व अँडी मरे या ‘बिग फोर’मधील एकानेच जेतेपद संपादन करण्याची ही एकूण 50 वी वेळ ठरली.

पोट्रो केवळ दुसऱयांदा अपयशी

न्यूयॉर्क शहरात संततधार पाऊस सुरु असल्याने रविवारच्या अंतिम लढतीत ऑर्थर ऍश स्टेडियमचे छत बंद करत सामना खेळवला गेला. डेल पोट्रोच्या पहिल्या तीन सर्व्हिस गेमवर दोन गुण प्राप्त करणाऱया ज्योकोव्हिचने लवकरच 5-3 अशी आघाडी मिळवली आणि हाच धडाका पुढेही कायम राखला. 29 वर्षीय पोट्रोचा फोरहँडचा फटका नेटमध्येच थोपल्यानंतर ज्योकोव्हिचने 22 शॉट्सची प्रदीर्घ रॅली जिंकली आणि पहिला सेटही थाटात आपल्या नावावर केला. यंदाच्या आवृत्तीत पोट्रोने एखादा सेट गमावण्याची ही केवळ दुसरीच वेळ ठरली. पण, हा दिवसच मुळात ज्योकोव्हिचचा होता.

दुसरा सेट 95 मिनिटात निकाली

दुसऱया सेटमध्येही सर्बियन जेत्याने 3-1 अशी आघाडी घेतली. अपवादाने डेल पोट्रोने संघर्ष साकारत 3-3 अशी बरोबरी प्राप्त केली. पण, ती देखील क्षणिकच ठरली. एकच गेम तब्बल 20 मिनिटे चालल्यानंतर हा सेट देखील 95 मिनिटानंतर निकाली झाला आणि ज्योकोव्हिचने टायब्रेकरवर यश संपादन केले. ज्योकोव्हिचच्या सलग दोन सेट विजयानंतर डेल पोट्रोकडे पिछाडी भरुन काढत जेतेपद खेचून आणण्याची संधी होती. यापूर्वी, 1949 मध्ये पँचो गोनालेसने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत असा पराक्रम गाजवला होता. पण, पोट्रोला मात्र त्यात यश आले नाही.

ज्योकोव्हिचचा निर्णायक विजय

तिसऱया सेटमध्ये ज्योकोव्हिचने 3-1 अशी आघाडी प्राप्त केली असता डेल पोट्रोने 3-3 अशी बरोबरी मिळवली. पण, 24 शॉट्सची रॅली जिंकत ज्योकोव्हिच 5-3 अशा आघाडीवर पोहोचला आणि त्याने त्यानंतर काही मिनिटात आपल्या 14 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोरही उमटवली. तीनच महिन्यांपूर्वी त्याला रोलाँ गॅरोवर प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच गारद व्हावे लागले होते. येथे मात्र त्याने त्या अपयशाची पुरेपूर भरपाई केली.

 

ऍश्ले बार्टी-कोको व्हॅन्डेवेघ महिला दुहेरीत विजेत्या

ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टी व अमेरिकेची कोको व्हॅन्डेवेघ यांनी महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी टिमीया बॅबोस व क्रिस्टिना म्लाडेनोव्हिच यांच्यावर 3-6, 7-6 (7-2), 7-6 (10-8) अशी मात केली. मात्र जेतेपदानंतर ट्रॉफीचे वितरण झाल्यानंतर त्यांना प्रेक्षकांशी बोलण्याची संधीच दिली गेली नाही. त्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले. ट्रॉफीचे वितरण झाल्यानंतर या दोघींना कोर्टबाहेर जाण्यासाठी एस्कॉर्ट करण्यात आले. प्रशिक्षक व कुटुंबियांचे तसेच प्रेक्षकांचे आभार मानण्याची संधी न दिल्याने दोघीही नाराज झाल्या होत्या. भविष्यात कधीतरी एखाद्या ग्रँडस्लॅममध्ये ही संधी मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पुरुष एकेरीचा अंतिम सामना होणार असल्याने आम्हाला लवकर बाहेर काढण्यात आले असावे, असे बार्टी म्हणाली. मात्र 10-15 मिनिटे उशीर झाला असता तरी त्यांनी तक्रार केली नसती. आम्हाला सर्वांचे आभार मानण्याची संधी मिळाली असती तर खूप आनंद वाटला असता. ही संधी दिली गेली नाही, हे पाहून आम्ही सुरुवातीला गोधळून गेलो होतो, असेही ती म्हणाली.

Related posts: