|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » क्रिडा » शतकवीर ऍलिस्टर कूक-रुटची द्विशतकी भागीदारी

शतकवीर ऍलिस्टर कूक-रुटची द्विशतकी भागीदारी 

उभयतांचे तिसऱया गडय़ासाठी 259 धावांचे योगदान

वृत्तसंस्था/ लंडन

ऍलिस्टर कूकने आपल्या शेवटच्या कसोटी डावात शानदार 147 धावांची खेळी साकारल्यानंतर विद्यमान कर्णधार जो रुटसह (125) तिसऱया गडय़ासाठी तब्बल 259 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली आणि पाचव्या व शेवटच्या कसोटीतील सर्व जानच काढून घेतली. नंतर पडझड झाली असली तरी या उभयतांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने सोमवारी या लढतीच्या चौथ्या दिवशी चहापानाअखेर 6 बाद 364 धावा जमवत भारतावर एकूण 404 धावांची आघाडी घेतली होती.

सोमवारी एकीकडे, ऍलिस्टर कूकने 33 वे शतक झळकावत आपल्या कारकिर्दीची दमदार सांगता केली तर दुसरीकडे, जो रुटने त्याला समयोचित साथ देताना 125 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. रुटसाठी गेल्या 28 डावातील हे पहिलेच शतक ठरले. दुखापतग्रस्त इशांतच्या गैरहजेरीत भारतीय गोलंदाज मात्र इथे चांगलेच झगडत राहिले. इशांतला गुडघा दुखत असल्याने मैदानाबाहेर जावे लागले आणि तो या लढतीतून बाहेर गेल्याचे संकेत होते.

ऍलिस्टर कूकच्या 286 चेंडूतील खेळीत 14 चौकारांचा समावेश राहिला तर रुटने 190 चेंडूत 12 चौकार व एक षटकार फटकावला. हनुमा विहारीने या उभयतांना दोन लागोपाठ चेंडूंवर बाद केले. पण, तोवर या जोडीने भारताच्या आव्हानातील पार हवाच काढून घेतली होती.

डावातील 70 व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या ओव्हरथ्रोसह कूकने 210 चेंडूत 33 वे कसोटी शतक झळकावले आणि प्रेक्षकांसह भारतीय खेळाडूंनी देखील टाळय़ांच्या गजरात त्याचे अभिनंदन केले.

उपाहारानंतर देखील कूक व रुट या जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणताना 303 चेंडूत आपली द्विशतकी भागीदारी फलकावर लावली होती. रुटला 94 धावांवर मिळालेले जीवदान देखील भारताला फटका देणारे ठरले. शमीच्या (2-97) डावातील 77 व्या षटकात पहिल्या स्लीपमध्ये पुजाराने त्याचा झेल सांडला. नंतर रुटने 151 चेंडूत आपले 14 वे कसोटी शतक साजरे केले. त्यानंतर त्याने खऱया अर्थाने आक्रमक पवित्र्यावर भर दिला आणि इंग्लंडने 88 व्या षटकात 300 धावांचा टप्पा सर केला.

विहारीचे दुहेरी झटके

डावातील 95 व्या षटकात विहारीने रुट व कूक यांना यष्टीमागे झेल देणे भाग पाडत डोकेदुखी ठरणारी ही जोडी फोडली. कूक बाद होऊन परतत असताना भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन करत त्याला अभिवादन दिले. शमीने नंतर जॉनी बेअरस्टोला (18) तर रवींद्र जडेजाने (2-147) जोस बटलरला शून्यावर बाद केले. इंग्लंडचा संघ त्यावेळी आणखी काही जलद धावा जमवत आपला दुसरा डाव घोषित करण्याच्या उंबरठय़ावर होता.

धावफलक (चहापानापर्यंत)

इंग्लंड पहिला डाव : सर्वबाद 332.

भारत पहिला डाव : सर्वबाद 292

इंग्लंड दुसरा डाव : ऍलिस्टर कूक झे. पंत, गो. विहारी 147 (286 चेंडूत 14 चौकार), केटॉन जेनिंग्स त्रि. गो. मोहम्मद शमी 10 (38 चेंडू), मोईन अली त्रि. गो. जडेजा 20 (52 चेंडूत 3 चौकार), जो रुट झे. पंडय़ा (बदली खेळाडू), गो. विहारी 125 (190 चेंडूत 12 चौकार, 1 षटकार), जॉनी बेअरस्टो त्रि. गो. मोहम्मद शमी 18 (27 चेंडूत 3 चौकार), बेन स्टोक्स खेळत आहे 13 (20 चेंडूत 2 चौकार), जोस बटलर झे. शमी, गो. जडेजा 0 (2 चेंडू), करण नाबाद 7 (15 चेंडू). अवांतर 24. एकूण 105 षटकात 6/364.

गडी बाद होण्याचा क्रम

1-27 (जेनिंग्स, 12.4), 2-62 (मोईन, 27.4), 3-321 (रुट, 94.1), 4-321 (कूक, 94.2), 5-355 (बेअरस्टो, 100.6), 6-356 (101.3).

गोलंदाजी

बुमराह 23-4-61-0, इशांत शर्मा 8-3-13-0, मोहम्मद शमी 23-3-97-2, रवींद्र जडेजा 43-3-147-2, हनुमा विहारी 8-1-24-2.

पहिल्या व शेवटच्या कसोटीत शतक झळकावणारा पाचवा फलंदाज

माजी कर्णधार ऍलिस्टर कूक हा आपल्या पदार्पणाच्या व शेवटच्या आंतरराष्ट्रीय कसोटीत शतक झळकावणारा फक्त पाचवा व पहिलाच इंग्लिश फलंदाज ठरला आहे. योगायोगाने कारकिर्दीतील पहिल्या कसोटीत देखील त्याने भारताविरुद्धच पहिले शतक (नाबाद 104) साजरे केले होते. 2006 मध्ये नागपूर कसोटीत त्याने त्यावेळी शतकी पदार्पण नोंदवले होते. कूकसाठी सोमवारचे शतक त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 33 वे शतक ठरले. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडतर्फे सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजात तोच अव्वलस्थानी राहिला आहे.

या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात कूक बुमराहच्या गोलंदाजीवर 71 धावांवर बाद झाला होता. पण, आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय डावात अशी कोणतीही चूक न करता त्याने 210 चेंडूत 8 चौकारांसह आपले शतक अगदी थाटात साजरे केले. भारताचा मोहम्मद अझहरुद्दिन यापूर्वी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपल्या पहिल्या व शेवटच्या कसोटीत शतक झळकावणारा शेवटचा फलंदाज ठरला. त्याने 1984 मध्ये इंग्लंडविरुद्ध कोलकाता कसोटीत 110 धावांसह कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर 2000 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बेंगळूर कसोटीत 102 धावांच्या शतकी खेळीसह आपल्या कसोटी कारकिर्दीची सांगता केली होती.

पहिल्या व शेवटच्या कसोटीत शतक झळकावणारे फलंदाज

फलंदाज-संघ / पदार्पणातील शतक (धावा) /प्रतिस्पर्धी / वर्ष/ शेवटच्या लढतीतील शतक (धावा) /प्रतिस्पर्धी /वर्ष

रेगिनाल्ड डफ-ऑस्ट्रेलिया / 104 / इंग्लंड / 1902 / 146 / इंग्लंड / 1905

विल्यम पॉन्सफोर्ड-ऑस्ट्रेलिया / 110 / इंग्लंड / 1924 / 266 / इंग्लंड / 1934

ग्रेग चॅपेल-ऑस्ट्रेलिया / 108 / इंग्लंड / 1970 / 182 / पाकिस्तान / 1984

मोहम्मद अझरुद्दीन-भारत / 110 / इंग्लंड / 1984 / 102 / द. आफ्रिका / 2000

ऍलिस्टर कूक-इंग्लंड / 104 / भारत / 2006 / 147 / भारत / 2018

 

 

सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत कूक पाचवा

ऍलिस्टर कूकने या डावात 76 धावा जमवल्या असताना कसोटीत सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत कुमार संगकाराला मागे टाकत पाचवे स्थान संपादन केले. सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस व राहुल द्रविड हे पहिल्या चार स्थानी विराजमान आहेत.