|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पाम ट्रीच्या फळांचे करायचे काय

पाम ट्रीच्या फळांचे करायचे काय 

आजरा तालुक्यातील शेतकऱयांसमोर यक्ष प्रश्न 

सुनील पाटील/ आजरा

शासनाच्या कृषी विभागाने आजरा तालुक्यात सन 2012-13 मध्ये नवा प्रयोग राबविला. कृषी विभाग व एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून तालुक्यात पाम वृक्षांची लागवड करून शेतकऱयांना त्यापासून आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही योजना राबविली गेली. मात्र गेल्या वर्षीपासून या वृक्षांना आलेली फळे कृषी विभाग व संबंधित कंपनीकडून फळ खरेदीकडे दुर्लक्ष केले जात असून पाम ट्रीच्या फळांचे करायचे काय असा यक्ष प्रश्न आजरा तालुक्यातील पाम उत्पादक शेतकऱयांसमोर उभा राहीला आहे.

कृषी विभागाने सन 12-13 मध्ये तालुक्यातील कोरीवडे, शेळप व एरंडोळ येथील शेतकऱयांना पाम लागवडीसाठी तयार करून सदर गावातील 12 हेक्टर क्षेत्रावर पाम लागवड केली. शासनाचा कृषी विभाग व गोदरेज ऍग्रोव्हेट या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱयांचे प्रबोधन करण्यात आले होते. आजरा तालुक्यातील शेतकऱयांसाठी हा प्रयोग नवा होता. तरीही काही प्रयोशील शेतकऱयांनी हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतकरी निवड करून पाम लागवड करण्यात आली. या वृक्षांना येणाऱया फळांपासून तेल करण्यात येते. यामुळे उत्पादीत होणारी सर्व फळे शासन व कंपनी घेऊन जाईल. त्यासाठी शेतकऱयांना चांगला मोबदलाही दिला जाईल असा करार त्यावेळी कृषी विभाग, संबंधित शेतकरी व कंपनी मध्ये करण्यात आला होता.

पाम लागवडीसाठी लागणारी रोपे कृषी विभागाने मोफत दिली होती. शिवाय सन 2012 पासून सलग तीन वर्षे म्हणजे सन 2015 पर्यंत प्रत्येक वर्षी प्रती हेक्टर 3 हजार रूपयांची खते शासनाकडून मोफत पुरविली गेली होती. शासनाकडून मिळणाऱया खतांपेक्षा जादाची लागणारी खते शेतकऱयांनी स्वत: खरेदी करून वापरली आहेत. पाम लागवडीनंतर पाच वर्षांनी या वृक्षांना गतवर्षी प्रथम फळे आली हेती. फळे आल्यानंतर कृषी विभागाशी संपर्क साधला असता पहिल्या वर्षीची फळे तोडून टाकण्यास सांगितले गेले. त्यानुसार शेतकऱयांनी गतवर्षी फळे तोडून टाकली. यावर्षी फळे आल्यानंतर ही फळे नेण्याबाबत कृषी विभागाकडे विचारणा केली गेली. मात्र याबाबत अद्याप कृषी विभागाने कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याचे शेतकऱयांनी सांगितले.

या वृक्षांच्या फळांपासून पाम तेलाची निर्मिती केली जात असल्याचे ही योजना राबविताना त्यावेळचे अधिकारी व कंपनीच्या प्रतिनिधींनी संगितले होते. ही फळे घेऊन जाण्याबाबतचा करारही केला होता. करार असतानाही कृषी विभाग तसेच संबंधित कंपनी आम्ही उत्पादीत केलेली फळे घेऊन जाण्याबाबत उदासिनता दाखवित असून कृषी विभागाचेही याकडे दुर्लक्क असल्याचा आरोप साळगांव येथील शेतकरी आनंदराव कुंभार यांनी केला आहे.

यापूर्वीही कृषी विभागामार्फत कोरफड व साबुदाणा लागवड करण्याबाबत शेतकऱयांना प्रोत्साहीत करण्यात आले होते. उत्पादीत होणारी कोरफड तसेच साबुदाणा शासन खरेदी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात शासनाने कोरफड व साबुदाणा नेला नाही. यामुळे शेतात लावली कोरफड व साबुदाणा ही पिके काढून बांधावर फेकून देण्याची पाळी शेतकऱयांवर आली होती. पाम उत्पादनाबाबतही अशी अवस्था होते की काय अशी भिती शेतकऱयांना वाटू लागल्याचे कुंभार यांनी सांगितले.

Related posts: