|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भारत बंदचा सोलापुरात फज्जा

भारत बंदचा सोलापुरात फज्जा 

प्रतिनिधी / सोलापूर

इंधन दरवाढ आणि महामागाई विरोधामधील भाजप सरकारबद्दलची असंतोषाची खदखद सोलापूर शहर-जिह्यातील नागरिकांचा मनात जरूर आहे. मात्र ती सोमवारी बंदच्या रूपाने दिसली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, तसेच माकपसह सर्व पक्षानी हाक दिलेल्या बंदला नागरिकांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. गौरी -गणपती सण उत्सव खरेदीच्या पार्श्वभूमीवर, नागरिक तसेच व्यापाऱयांनी जणू काही बंद धूडकावून लावल्याचे चित्र सोलापूर शहर-जिह्यात पहायला मिळाले. सर्वच व्यवहार शंभर टक्के सुरुळीत असल्याची खरीखुरी परिस्थिती जिह्यात सर्वत्र होता. बंदचा फज्जा उडाला. बंद केवळ विरोधी पक्षांपुरता मर्यादीत होता हे लपून राहिले नाही. आंदोलनकर्ते निघून जाताच व्यापाऱयांनी आपल्या दुकानांची शटर्स ‘ओपन’ केली. याच दरम्यान आंदोलकर्ते पोलीस व्हॅनमध्ये ‘क्लोज’ झाले.

भाजप सरकारच्या काळात इंधनाचे दर आकाशला भिडले आहेत. त्याशिवाय जीवनाश्यक सर्व वस्तुंची महागाई गगनाला भिडली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, सर्वसामान्य जनतेला जगणे मुष्कील झाल्याचा नारा देत काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. काँग्रेसच्या या आंदोलनास राष्ट्रवादी, माकप तसेच अन्य सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता.

  तथापि वारंवारच्या बंदला कंटाळलेल्या सोलापूर शहर-जिह्यावासियांनी सोमवारच्या बंदला संपूर्णपणे बगल दिली. मुख्य सोलापूर शहरात सोमवारी सकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि माकच्या नेते, पुढारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी नवी पेठ तसेच टिळक चौक, सराफ कट्टा आदी ठिकाणच्या बाजारपेठा बंद करण्याचा प्रयतन केला. काही वेळ या ठिकाणच्या बाजार पेठा व्यापाऱयांनी बंद देखील केल्या. मात्र आंदोलनकर्ते निघून गेल्यानंतर व्यापाऱयांनी आपल्या दुकानांची शटर्स खोलत व्यवहार सुरु केले. नागरिकांनीदेखील बंदला न जुमानता खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु केले. साधारण सकाळी अकरा वाजलेपासून सर्व व्यवहार शंभर टक्के सुरळीत झाले. गौरी- गणपती सण उत्सवाच्या खरेदीसाठी शहर तसेच जिह्यातुन आलेल्या  नागरिकांची कसलीही गैरसोय यातुन झाली नाही.

 

ठळक नोंदी

– रेल्वे स्टेशन समोर अज्ञातांकडून टायर जाळण्याचा प्रयत्न

– एरव्हीप्रमाणे आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा समाजकंटकांचा डाव फसला

– माकपच्या आंदोलनकर्त्यांनी पेट्रोलपंप बंद पाडण्याचा केला होता प्रयत्न

–  पेट्रोलपंप बंद पाडण्याचा प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला

– बंदसाठी रस्त्यावर उतरलेल्या सर्व पक्षीय नेत्याना पोलीसांनी ताब्यात घेवून दिले सोडून 

– शाळा, महाविद्यालये, बँका, आठवडी बाजार, सरकारी कार्यालये, रिक्षा, एसटी तसेच सिटी बसेस सर्व होते सुरु

– बंदबद्दल नागरिकांनी स्वतःहून दिल्या संतापजनक प्रतिक्रिया

– ग्राहकांनी व्यापाऱयांना उघडण्यास भाग पाडली दुकाने