|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रचंड महागाईमुळे जनतेची होरपळ

प्रचंड महागाईमुळे जनतेची होरपळ 

प्रतिनिधी/ फोंडा

इंधन व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड वाढ तसेच इतर जीवनावश्यक वस्तुंचे भाव भडकले असून केंद्रातील भाजपा सरकारचे महागाईवर कुठलेच नियंत्रण राहिलेले नाही. या सरकारने केवळ उद्योगपतींच्या हिताची धोरणे राबवून सर्वसामान्य जनतेला संकटात ढकलले आहे. ऐन चतुर्थीच्या तोंडावर गोमंतकीय जनतेवर महागाईचे विघ्न आलेले आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी केला.

पेट्रोल, डिझेलचे व गॅस सिलिंडरमध्ये झालेली दरवाढ तसेच वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या देशव्यापी निदर्शनाचा भाग म्हणून फोंडा शहरातही काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे काल सोमवारी निदर्शने करण्यात आली. चतुर्थी जवळ असल्याने नियोजित बंद मागे घेऊन केंद्र सरकारविरोधात केवळ निदर्शने करण्यात आली. फोंडा येथील जुन्या बसस्थानकावर आमदार रवी नाईक यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली. तसेच बाजारपेठेत पत्रके वाटण्यात आली. केंद्रातील भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई दर दिवशी वाढत चालली आहे. सरकारने इंधनावर मोठय़ाप्रमाणात जकात वाढविल्याने महागाईचा भडका उडाल्याचा आरोप रवी नाईक यांनी केला. हा कर लागू करुन सरकारने रु. 11 लाख कोटींहून अधिक कर गोळा केला आहे. सरकारने ही जकात कमी करुन इंधन व गॅस सिलिंडर जीएसटी कर प्रणालीखाली आणावा. तसे केल्यास इंधनाचे दर अर्ध्याहून कमी होतील, असे रवी नाईक यांनी सांगितले. इंधनाबरोबरच डाळ, दूध व इतर जीवनावश्यक वस्तूंचे भावही भडकले आहेत. त्यावर सरकारचे कुठलेच नियंत्रण राहिलेले नाही. रोजगार वाढविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण बनले आहे. विदेशातील काळे धन पुन्हा देशात आणून आम जनतेच्या बँक खात्यात प्रत्येकी रु. 15 लाख जमा करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र          मोदी यांनी दिले होते. किमान हे पैसे तरी जनतेपर्यंत पोचवा, महागाईतून गरीबांना दिलासा मिळेल अशी टिकाही रवी नाईक यांनी केली. यावेळी फोंडा गट काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ासंख्येने उपस्थित होते.