|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » महागाई विरोधात काँग्रेसची निदर्शने

महागाई विरोधात काँग्रेसची निदर्शने 

पेट्रोल पंपांवर पत्रके वाटून केली जनजागृती

प्रतिनिधी/ पणजी

इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांतर्फे देशभरात बंद आयोजित करण्यात आलेला असताना गोव्यात मात्र कोणत्याही प्रकारचा बंद पाळण्यात आला नाही. येथील सर्व व्यवहार आणि जनजीवन सुरळीत चालू राहिले.  तथापि, काँग्रेस, कम्युनिस्ट, आप या पक्षांनी राजधानी पणजीसह राज्यात विविध ठिकाणी महागाई-दरवाढीबद्दल मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

राजधानी पणजीत आप, कम्युनिस्ट, काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महागाई-दरवाढीकडे जनतेचे लक्ष वेधले. काँग्रेस पक्षाने देशभर बंद चे आवाहन केले होते. परंतु गोव्यातील काँग्रेस पक्षाने मात्र बंदला पाठिंबा दर्शवला नाही. गणेश चतुर्थी ऐन तोंडावर आलेली असताना बंद पाळणे योग्य नसल्याचे राज्यातील काँग्रेसने स्पष्ट केले. तथापि, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडर यातील दरवाढ दाखवणारी पत्रके पेट्रोल पंपावर वाटून जनजागृती केली.

पेट्रोल पंपवर काँग्रेसतर्फे निदर्शनs

पणजीतील फेरीबोट समोरील पेट्रोल पंपवर काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला आणि ग्राहकांना पत्रके वितरित केली. काँग्रेसचे प्रभारी डॉ. चेल्लाकुमार, आमदार जेनिफर मोन्सेरात, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, विजय पै व अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या निदर्शनात भाग घेतला. 2014 मध्ये काँग्रेस काळात इंधनाचे दर किती होते आणि आज 2018 मध्ये भाजपच्या काळात किती दरवाढ झालेली आहे याची माहिती पत्रकातून देण्यात आली आहे. दरवाढीमुळे जनतेमध्ये असंतोष असल्याचे दिसून येत आहे.

मोदींनी जनतेची फसवणूक केली : फोन्सक्sाढा

भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली असून पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सर्वसामान्यांना महागाईच्या संकटात टाकले आहे, असा आरोप आयटकचे ख्रिस्तोफर फोन्सका यांनी केला. आयटकतर्फे पणजीतील क्रांति सर्कलकडे निदर्शने करण्यात आली.

मडगावात कामतांच्या नेतृत्वाखाली निदर्शने

मडगाव पालिका चौकात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला. गेल्या चार वर्षात महागाई कशी झाली याचा तपशील देणारी पत्रके लोकांना वितरित केली. मडगावातील पेट्रोप पंपावरही काँग्रेसचे कार्यकर्ते ही पत्रके वितरित करीत होते. मडगावचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, मडगाव गट काँग्रेसचे अध्यक्ष गोपाळ नाईक, नगरसेवक अविनाश शिरोडकर, डॉरिस टेक्सेरा, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

ऐन गणेशचतुर्थीत महागाईचे विघ्न : रवी

फोंडय़ातही निदर्शने करण्यात आली. त्यामध्ये आमदार रवी नाईक यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. इंधन व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड वाढ तसेच इतर जीवनावश्यक वस्तुंचे भाव भडकले असून केंद्रातील भाजपा सरकारचे महागाईवर कुठलेच नियंत्रण राहिलेले नाही. या सरकारने केवळ उद्योगपतींच्या हिताची धोरणे राबवून सर्वसामान्य जनतेला संकटात ढकलले आहे. ऐन चतुर्थीच्या तोंडावर गोमंतकीय जनतेवर महागाईचे विघ्न आलेले आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी केला.

पेडणेत पेट्रोल पंपांवर पत्रकांचे वितरण

पेडणे येथे काँग्रेस गटाध्यक्ष उमेश तळवणेकर, केंद्रीय समिती सदस्य सुभाष केरकर, पेडणे गट उपाध्यक्ष प्रशांत आरोलकर, सदस्य उत्तम कशालकर, राजन पार्सेकर, गजानन कांबळी, यशवंत मळीक, दिवाकर जाधव आदी कार्यकर्त्यांनी पेडणे मतदारसंघातील तीन पेट्रोल पंपावर जाऊन दरवाढीची पत्रके वाटून सरकारचा निषेध केला.

कुडचडे गट काँग्रेसतर्फे पेट्रोल व अन्य वस्तूंचे दर वाढत असल्याने, या दरवाढीचा निषेध करून लोकांमध्ये जागृता निर्माण करण्यासाठी कुडचडेतील पेट्रोल पंपवर पत्रके वितरित करण्यात आली.

Related posts: