|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हनुमाननगर येथे 7 लाखांची घरफोडी

हनुमाननगर येथे 7 लाखांची घरफोडी 

निवृत्त कर्नलच्या घरी चोरी, कडीकोयंडा तोडून दागिने पळविले

प्रतिनिधी/ बेळगाव

मुरलीधर कॉलनी, हनुमाननगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे 7 लाख रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने पळविले. सोमवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

निवृत्त कर्नल शिवानंद बसाप्पा करडी यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला. 5 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आपल्या घराला कुलूप घालून शिवानंद व कुटुंबीय नातेवाईकांना भेटण्यासाठी बेंगळूरला गेले होते. सोमवारी 10 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता ते बेंगळूरहून घरी परतले त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.

बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी 22 तोळय़ांहून अधिक सोन्याचे दागिने व दोन किलो चांदीचे दागिने पळविले आहेत. चोरीचा प्रकार उघडकीस येताच एपीएमसी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त महानिंग नंदगावी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली.

चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. 5 सप्टेंबरच्या रात्री 8 पासून सोमवारी सकाळी 10 या वेळेत बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी तिजोरीतील दागिने पळविल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

गणेशोत्सवाच्या तोंडावर चार दिवसांपूर्वी रुक्मिणीनगर येथे 5 लाखांची घरफोडी झाली होती. ही घटना ताजी असतानाच हनुमाननगर येथे घरफोडीची दुसरी घटना घडली आहे. बेळगावकर गणेशोत्सवाच्या तयारीत असताना चोरटय़ांनी उच्छाद मांडला असून चोऱया, घरफोडय़ांबरोबरच एकाकी वृद्धांना गाठून दागिने व रोकड पळविण्याचे प्रकारही वाढले आहेत.

Related posts: