|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खानापुरात देशव्यापी बंदचा फज्जा

खानापुरात देशव्यापी बंदचा फज्जा 

खानापूर / वार्ताहर

सोमवारी पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदचा खानापुरात कोणताच परिणाम झाला नाही. राज्य शासनाने या बंदला पाठिंबा दिल्याने शाळा-कॉलेजीसना सुट्टी देण्यात आली होती. तसेच बस आगारातून धावणाऱया बसेस ठप्प ठेवण्यात आल्या होत्या. मात्र खानापूरच्या बाजारपेठेवर तसेच दैनंदिन व्यवहारावर या बंदचा कोणताच परिणाम दिसून आला नाही.

अवघ्या दोन दिवसावर श्री गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी खानापुरात खेडय़ापाडय़ातील लोकांची गर्दी झाली होती. सोमवारी दिवसभर बाजारपेठ खरेदीसाठी फुलली असल्याने बंदचा कोणताच परिणाम दिसून आला नाही.

खानापूर शहरातून जाणाऱया बेळगाव-पणजी महामार्गावर सकाळच्या प्रहरी मात्र वाहनांची गर्दी कमी होती. पण दुपारनंतर अनेक अवजड वाहने ये-जा करताना दिसत होती. खानापुरातील सर्व पेट्रोल पंप सुरु होते. त्यामुळे या बंदचा खानापुरात कोणताच परिणाम झाला नाही.

या बंदचा पार्श्वभुमीवर खानापूर कॉग्रेस तसेच निजदच्या मोजक्या कार्यकर्त्यानी शिवस्मारक चौकात रास्तारोको करुन केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन निदर्शने केली. व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.