|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नॅशनल एअरपोर्ट अधिकाऱयांकडून आढावा

नॅशनल एअरपोर्ट अधिकाऱयांकडून आढावा 

भूषण देसाई / परुळे

सिंधुदुर्ग चिपी-परुळे विमानतळाची पहिली चाचणी विमान 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लँडींग होणार असल्याने आयआरबी कंपनी व नॅशनल एअरपोर्टच्या अधिकाऱयांनी सोमवारी धावपट्टी व कंट्रोलरुमच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, केंद्रीय वाणिज्य उद्योग व मुलकी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्ग विमानतळाचा उड्डाण योजनेत समावेश करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच सिंधुदुर्गवासीयांना विमान टेस्टींगसाठी 12 रोजी लँड करून गणेशोत्सवाची भेट देण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, या विमानातून कोणीही व्हीआयपी प्रवास करणार नसल्याचे सांगण्यात आले.

10 रोजी विमानतळावर तपासणीसाठी विमानाने नॅशनल एअरपोर्ट ऍथॉरिटीच्या ऑपरेटरचे पथक येणार होते. मात्र, हे पथक आले नाही व विमानही लँडींग झाले नाही. आता 12 रोजीच विमानतळाची अंतर्गत तपासणी होणार आहे. 12 रोजी विमानतळावर विमानांचे लँडींग होणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास 12 सप्टेंबर रोजी चाचणी विमान लँड होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

          आयआरबीच्या अधिकाऱयांमध्ये आनंदी वातावरण

12 रोजी विमान चाचणीसाठी लँडींग होणार असल्याचा मेसेज दिल्ली येथून एअरपोर्ट ऍथॉरिटीच्या कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर एअरपोर्टचे काम करणाऱया  आयआरबी कंपनीचे प्रकल्प संचालक राजेश लोणकर, जनसंपर्क अधिकारी जयंत डांगरे, योगेश म्हात्रे यांच्यासह सर्व अधिकाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेली पाच वर्षे काम करीत असलेल्या विमानतळाला मूर्तस्वरुप येत असल्याचे समजताच त्यांनी आनंद क्यक्त केला.

         धावपट्टी व नियंत्रण कक्षाच्या तयारीचा आढावा

विमान लँडींग होणार असल्याने धावपट्टी व नियंत्रण कक्षांच्या तयारीचा आढावा नॅशनल एअरपोर्ट ऍथॉरिटीच्या आलेल्या अधिकाऱयांनी सकाळी घेतला. यावेळी कंपनीचे अधिकारी त्यांच्या समवेत होते.

         केसरकर व राऊत करणार विमानतळावर स्वागत

मुलकी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी विमान लँडींगबाबत आज आढावा घेतला आणि 12 तारीखला विमान लँडींग होईल, असे सांगितले. चिपी एअरपोर्ट येथे खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर स्वागत करतील. हे विमान नॉन शेडय़ूल असणार असून स्क्रू व गणपतीची मूर्ती असेल, असे प्रभू यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.