|Saturday, July 20, 2019
You are here: Home » leadingnews » भिमा कोरेगाव हिंसाचाराचे ‘सत्य’ आले समोर

भिमा कोरेगाव हिंसाचाराचे ‘सत्य’ आले समोर 

ऑनलाईन टीम / मुंबई

कोरेगाव भीमामधील हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याची माहिती सत्यशोधन समितीच्या अहवालातून समोर आली आहे. पोलिसांच्या गाफिलपणामुळे हिंसाचार घडल्याचे समितीने अहवालात उल्लेख केला आहे. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या हिंदुत्ववादी नेत्यांनी हिंसाचार होईल, अशी परिस्थिती निर्माण केली, असंदेखील समितीने म्हटले आहे.

कोरेगाव भीमामधील हिंसाचारानंतर सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांकडे सुपूर्द केला आहे. पोलीस महानिरीक्षकांनी या समितीची स्थापना करण्याच्या सूचना केल्या होत्या. पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे या समितीचे अध्यक्ष होते. वढू बुद्रुक आणि गोविंद गायकवाड यांच्या इतिहासाची मोडतोड करण्यासाठी मिलिंद एकबोटे यांनी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीची स्थापना केली होती, असे या समितीने अहवालात म्हटले आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महार समाजाच्या गोविंद गायकवाड यांनी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. संभाजी महाराजांच्या समाधीजवळील फलक बदलण्यात आल्याचा उल्लेख समितीच्या अहवालात आहे. ‘संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गोविंद गायकवाड यांनी केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख समाधीजवळील फलकावर होता. तो फलक हटवून तिथे नवा फलक लावण्यात आला. या नव्या फलकावर गोविंद गायकवाड यांच्याबद्दलची चुकीची माहिती होती. याशिवाय नव्या फलकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक के. बी. हेडगेवार यांचा फोटोदेखील होता. संभाजी महाराजांच्या समाधीजवळ हेडगेवार यांचा फोटो लावण्याची गरज नव्हती. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक नवा फलक लावण्यात आला. पोलिसांनी योग्य वेळी पावले उचलली असती, तर हिंसाचार टळू शकला असता,’ असे सत्यशोधन समितीने अहवालात नमूद केले आहे. 30 डिसेंबरला मिलिंद एकबोटे यांनी पेराणे फाटा येथील सोनाई हॉटेलमध्ये एक बैठक घेतली होती. ‘1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमामध्ये काळा दिवस पाळण्याचे आवाहन या बैठकीत एकबोटे यांनी केले. यानंतर तसे पत्र कोरेगाव भीमाच्या ग्रामस्थांनी पोलिसांना दिले,’ अशी माहिती अहवालात नमुद आहे. या परिसराजवळील सणसवाडीत राहणाऱया लोकांना हिंसाचाराची पूर्वकल्पना होती, असादेखील आरोप होत आहे. हिंसाचाराची कल्पना असल्याने सणसवाडीतील लोकांनी दुकाने आणि हॉटेल्स बंद ठेवली होती. याशिवाय त्यांनी पाण्याचे टँकर रॉकेलने भरुन ठेवले होते आणि गावात काठय़ा आणि तलवारी आणून ठेवल्या होत्या. कोरेगाव भीमामध्ये अशा घटना घडत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, अशा शब्दांमध्ये सत्यशोधन समितीने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. पोलिसांना हिंसाचाराची माहिती देणारे अनेक कॉल करण्यात आले. मात्र त्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा ठपका अहवालातून ठेवण्यात आला आहे. ‘हिंसाचार होत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली. त्यामुळे पोलीस आपल्यासोबत आहेत, काळजी करु नका, अशा घोषणा देण्यापर्यंत जमावातील काहींची मजल गेली,’ असे सत्यशोधन समितीने अहवालात नमूद केले आहे.