अभिनेता सुबोध भावेला कसबा गणपती पुरस्कार मंडळाचा यंदा 126 वा गणेशोत्सव

ऑनलाईन टीम / पुणे
पुण्यनगरीचे ग्रामदैवत, मानाचा पहिला ‘श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ यंदा 126 वा गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदाचा मानाचा ‘श्री कसबा गणपती पुरस्कार’ कलाक्षेत्रासाठी अभिनेता सुबोध भावेला जाहीर करण्यात आला.
13 रोजी कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्या जोशी यांच्या हस्ते केली जाणार आहे. प्रतिष्ठापना मिरवणूक उत्सव मंडळातून सकाळी 8.30 वाजता सुरू होणार आहे. यामध्ये पारंपरिक वाद्यांचा समावेश असणार आहे. नगारा, चौघडा, प्रभात बँड व 2 ढोलपथके-आवर्तन-श्रीराम मिरवणूकीसाठी सज्ज आहेत. हमाल वाडा, कुंटे चौक, वैभव चौक, अप्पा बळवंत चौक, फरासखाना, लाल महाल चौकातून उत्सव मंडप अशी श्रींची आगमन मिरवणूक असणार आहे. यंदाचा मानाचा ‘श्री कसबा गणपती पुरस्कार’ पुण्यासाठी विशेष योगदान देणाऱया विविध क्षेत्रातील व्यक्तिंना देण्यात येतो. यंदा कलाक्षेत्रातील अभिनयासाठी अभिनेता सुबोध भावे यांना, वैदिक क्षेत्रासाठी प्रकाश दंडगे गुरूजी, क्रीडा क्षेत्रासाठी शिरीन लिमये, शैक्षणिक राहुल कराड आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. योगेश बेंडाळे यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच कै. भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार ऍड. भास्करराव आव्हाड यांना देण्यात येणार आहे.
यंदा मंडळाकडून इवेस्ट संकलन हा अनोखा उपक्रम राबविणार आहे. घरातील ईकचऱयाबाबत नागरिकांत जागरूकता निर्माण करून तो संकलित करण्याचे काम मंडळाद्वारे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड रिटायर्ड ऑफिसर्स असोसिएशन इकोतंत्रा यांच्यामार्फत इवेस्ट संकलन केले जाणार आहे. हा उपक्रम उत्सव मंडपात 14 ते 22 सप्टेंबर या कालावधीत राबविला जाणार आहे. मंडळाचे श्रीकांत शेटय़े, भूषण रूपदे, ऋग्वेद निरगुडकर, श्रीकृष्ण भोळे, सौरभ धोपटे या पदाधिकाऱयांनी पुण्यात गणेशोत्सव कार्यक्रम जाहीर केला.