|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » क्रिडा » झुंजार लढतीनंतर भारताच्या पदरी निराशा

झुंजार लढतीनंतर भारताच्या पदरी निराशा 

ऍलिस्टर कूकच्या कारकिर्दीची विजयाने सांगता, इंग्लंडचा कसोटी मालिकेत 4-1 ने विजय,

वृत्तसंस्था / लंडन

युवा फलंदाज ऋषभ पंत व केएल राहुल यांच्या झुंजार शतकांनंतरही भारताला इंग्लंडविरुद्ध पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्यात 118 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. चौथ्या डावात 464 धावांचे आव्हान असताना भारताने सर्वबाद 332 धावांपर्यंत मजल मारली. केएल राहुल (149) व ऋषभ पंत (114) या शतकवीरांनी सहाव्या गडय़ासाठी 204 धावांची धडाकेबाज द्विशतकी भागीदारीमुळे रंगत निर्माण झाली होती. अगदीच सामना जिंकता आला नाही तर तो अनिर्णीत तरी राहील, अशीही अपेक्षा होती. पण, हे दोघेही बाद झाले आणि त्यानंतर भारताची शेपटी गुंडाळण्यासाठी इंग्लंडला फारसा अवधी लागला नाही. या सामन्यासह माजी कर्णधार ऍलिस्टर कूकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची यशस्वी सांगता झाली. 

केएल राहुलने या दुसऱया डावात 224 चेंडूत 20 चौकार व एका षटकारासह 149 धावांची आतषबाजी केली तर ऋषभ पंतने 146 चेंडूत 15 चौकार व 4 षटकारांसह 114 धावा फटकावत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले होते. एकवेळ तर ते विजय खेचून आणण्याचा चमत्कार करणार का, असाही आशेचा कवडसा दिसून येत होता. पण, डावातील 82 व्या षटकात रशीदने प्रचंड वळलेल्या चेंडूवर केएल राहुलची एकाग्रता भंगली व त्याचा त्रिफळा उडाल्यानंतर भारताच्या आशाअपेक्षांना देखील मोठा सुरुंग लागला.

शेन वॉर्नच्या हातभर वळणाऱया चेंडूंची आठवण ताजी करणारा रशीदचा लेगब्रेक चेंडू खऱया अर्थाने निर्णायक ठरला. ‘रफ’मध्ये पडल्यानंतर हा चेंडू अचानक खूपच वळला आणि यष्टी उद्ध्वस्त होत असताना केएल राहुलचा बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्ण फसला. राहुलची शतकी खेळी संपुष्टात आणण्यासाठी चमत्कारिक चेंडूची गरज होती आणि रशीदने त्याची पूर्तता केली. रशिदनेच नंतर आक्रमक फलंदाजी साकारणाऱया ऋषभ पंतचा देखील बळी घेतला. पंतने लाँगऑफवरील अलीकडे झेल देत तंबूचा रस्ता धरला.

रुटने नवा चेंडू घेतल्यानंतर करणने (9 षटकात 2/23) इशांत व जडेजाचे बळी घेतले. दुखापतीमुळे गोलंदाजीला उतरु न शकलेल्या इशांतने करणच्या गोलंदाजीवर बेअरस्टोकडे झेल दिल्यानंतर मैदानी पंचांच्या निर्णयावर डीआरएस घेतला होता. पण, त्यानंतरही हा निर्णय जैसे थे राहिला. 46 चेंडूत 13 धावा जमवणारा रवींद्र जडेजा देखील यष्टीरक्षकाकडे झेल देतच तंबूत परतला. पुढे, डावातील 95 व्या षटकात जलद गोलंदाज जेम्स अँडरसनने शमीला बाद करत या मालिकेतील शेवटचा बळी बाद केला आणि इथेच इंग्लंडच्या 4-1 अशा मालिकाविजयावर देखील शिक्कामोर्तब झाले. अँडरसनने या बळीसह मॅकग्राचा 563 कसोटी बळींचा विक्रम देखील मागे टाकला.

तत्पूर्वी, दिवसभरातील दुसरे सत्र आक्रमक फलंदाजी करणाऱया ऋषभ पंतने चांगलेच गाजवले. या शतकासह त्याने खराब यष्टीरक्षणाची काही प्रमाणात भरपाई करण्याचा प्रयत्न केला. पहिले सत्र गाजवणाऱया केएल राहुलने ऋषभचा धडाका पाहत त्याला अधिक स्ट्राईक देण्यावर भर दिला. इंग्लंडने मोईन अली व अदिल रशिदकडे अधिक चेंडू सोपवल्याने ऋषभने त्याचा पुरेपूर लाभ घेतला. त्याने विशेषतः ऑनसाईडला अधिक फटकेबाजी केली. इंग्लिश भूमीत शतक झळकावणारा तो पहिलाच भारतीय यष्टीरक्षक देखील ठरला. यापूर्वी धोनीने इंग्लंडमध्ये 92 धावा जमवल्या होत्या व तीच एखाद्या भारतीय यष्टीरक्षकाची सर्वोत्तम कामगिरी होती.

दिवसाच्या प्रारंभी, केएल राहुलने आपल्या फलंदाजीतील दर्जा दाखवून दिला. त्याने 19 चौकार व एक षटकार खेचत इंग्लंडला सहजासहजी यश मिळणार तर नाहीच. पण, उलटपक्षी झगडावे लागेल, याचे दाखले दिले. राहुलसाठी हे पाचवे कसोटी शतक ठरले. मात्र, मालिकेतील मागील 9 कसोटी डावानंतर 50 पेक्षा अधिक धावा जमवण्याची त्याची ही पहिलीच वेळ ठरली.

राहुलने सर्वप्रथम उपकर्णधार अजिंक्य रहाणेसमवेत (106 चेंडूत 37) चौथ्या गडय़ासाठी 118 धावांची भागीदारी साकारली. मोईन अलीला पॅडल स्वीप करण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट बहाल केली. हनुमा विहारीला मात्र सूर सापडला नाही. तो शून्यावरच तंबूत परतला. भारताने 3 बाद 58 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर रहाणे व राहुल यांनी प्रारंभी आश्वासक खेळी साकारली होती.

धावफलक

इंग्लंड पहिला डाव : सर्वबाद 332

भारत पहिला डाव : सर्वबाद 292

इंग्लंड दुसरा डाव : 8/423 वर घोषित

भारत दुसरा डाव : केएल राहुल त्रि. गो. रशीद 149 (224 चेंडूत 20 चौकार, 1 षटकार), शिखर धवन पायचीत गो. अँडरसन 1 (6 चेंडू), चेतेश्वर पुजारा पायचीत गो. अँडरसन 0 (3 चेंडू), विराट कोहली झे. बेअरस्टो, गो. ब्रॉड 0 (1 चेंडू), अजिंक्य रहाणे झे. जेनिंग्स, गो. अली 37 (106 चेंडूत 5 चौकार), हनुमा विहारी झे. बेअरस्टो, गो. स्टोक्स 0 (6 चेंडू), ऋषभ पंत झे. अली, गो. रशीद 114 (146 चेंडूत 15 चौकार, 4 षटकार), रवींद्र जडेजा झे. बेअरस्टो, गो. करण 13 (46 चेंडूत 2 चौकार), इशांत शर्मा झे. बेअरस्टो, गो. करण 5 (24 चेंडूत 1 चौकार), शमी त्रि. गो. अँडरसन 0 (3 चेंडू), बुमराह नाबाद 0 (2 चेंडू). अवांतर 26. एकूण 94.3 षटकात सर्वबाद 345.

गडी बाद होण्याचा क्रम

1-1 (धवन, 2.3), 2-1 (पुजारा, 2.6), 3-2 (विराट, 3.2), 4-120 (रहाणे, 35.3), 5-121 (विहारी, 36.4), 6-325 (केएल राहुल, 81.1), 7-328 (ऋषभ पंत, 83.6), 8-336 (इशांत, 91.6), 9-345 (जडेजा, 93.4), 10-345 (शमी, 94.3).

गोलंदाजी

अँडरसन 22.3-11-45-3, ब्रॉड 12-1-43-1, मोईन अली 17-2-68-1, करण 9-2-23-2, स्टोक्स 13-1-60-1, रशीद 15-2-63-2, रुट 6-1-17-0.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेवर दृष्टिक्षेप

लढत / ठिकाण / निकाल

पहिली कसोटी / बर्मिंगहम / इंग्लंड 31 धावांनी विजयी

दुसरी कसोटी / लंडन / इंग्लंड 1 डाव, 159 धावांनी विजयी

तिसरी कसोटी / नॉटिंगहम / भारत 203 धावांनी विजयी

चौथी कसोटी / साऊथम्प्टन / इंग्लंड 60 धावांनी विजयी

पाचवी कसोटी / लंडन / इंग्लंड 118 धावांनी विजयी