|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मेडिकलच्या विद्यार्थ्यांना लुबाडणारा पोलीस निलंबित

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना लुबाडणारा पोलीस निलंबित 

शहर सुधार समितीच्या पाठपुराव्याला यश

प्रतिनिधी/ सांगली

 रात्री  जेवणानंतर वैद्यकिय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर फिरणाऱया दोन विद्यार्थ्यांना  पोलीस ठाण्यात नेऊन पैसे उकळणारा मिरज शहर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस फौजदार बाबासाहेब पाटील याला मंगळवारी निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी ही कारवाई केली. यासाठी सांगली जिल्हा सुधार समितीने व्हिडिओ चित्रीकरण करून पोलखोल करत पाठपुरावा केला होता.

 याबाबत समजलेली माहिती अशी, दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास, डी. फार्मसीचे दोन विद्यार्थी जेवणानंतर फिरण्यासाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर गेले होते. त्यावेळी गस्तीच्या पोलिसांनी त्यांना का फिरत आहात अशी विचारणा करून गाडीत बसवून मिरज शहर  पोलीस ठाण्यात नेले. विद्यार्थ्यांनी घाबरल्याने सुधार समितीच्या नितीन मोरे यांना पोलीस ठाण्यात मदतीसाठी बोलावले. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब पाटील यांनी 5000 रुपये द्या अन्यथा गुन्हा दाखल करतो असे संबंधितांना धमकावले.

 विद्यार्थ्यांचे शिक्षण व करिअर यामुळे घाबरलेल्या पालकांनी पोलीस अधिकारी पाटील यांना  दोन हजार रुपये देऊन विनाकारण गुन्हा दाखल करू नये अशी विनंती केली. पण ही घटना सुधार समितीचे कार्यकर्ते  नितीन मोरेंनी कॅमेऱयात कैद करून व्हायरल केली. तसेच समितीच्या वतीने याची तक्रार व पाठपुरावा करण्यात आला. मंगळवारी  सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब पाटील याला निलंबित करण्यात आले असून मिरज उपविभागीय पोलीस अधिकाऱयांमार्फत चौकशी सुरू केली आहे.

 सांगली जिल्हा सुधार समितीच्या तक्रारीची व पाठपुराव्याची दखल घेऊन ही कारवाई केली असून, गोरगरीब व असाह्य जनतेची लुबाडणूक करणाऱयांना असाच धडा शिकवला जाईल व कायदा हा सामान्यांच्या रक्षणासाठी सुधार समिती कायम सक्रिय असेल असे समितीचे कार्याध्यक्ष ऍड. अमित शिंदे यांनी सांगितले.