|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पश्चिम महाराष्ट्र कुणाची जहागिरदारी नाही

पश्चिम महाराष्ट्र कुणाची जहागिरदारी नाही 

प्रतिनिधी/ सांगली

सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्हय़ातील सर्वच संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपलिका भाजपाने जिंकल्या आहेत. आता विधानसभेलाही एकाद दुसरी जागा जाईल नाहीतर सर्वच जागा भाजपा जिंकेल. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कुणाचा बालेकिल्ला नाही, किंवा जाहगीरदारी नाही, असा टोला महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांना लगावला. लोकसभेला खासदार संजयकाका पाटील विक्रमी मतांनी विजयी होती. तसेच शेखर इनामदार यांची यांची पक्ष नीट दखल घेईल, असेही आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

भाजपा नेते आणि नगरसेवक शेखर इनादारा यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महापौर संगीता खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, मकरंद देशपांडे आदी नगरसेवक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, भाजपाने पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थावर विजय मिळविली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर कुणाची जाहगिरदारी नाही. येथील जनता काम करणाऱयांना संधी देते. त्यामुळे आगामी विधानसभेला या जिल्हय़ातील एकाद दुसरी जागा जाईल, नाहीतर सर्वच जागांवर भाजपा विजय मिळवेल. यश टिकविण्यासाठी जनतेने टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून काम केल्यास अडचणी नाही. नम्र राहून काम करावे. इनामदार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेला खासदार संजयकाका पाटील विक्रमी मतांनी विजयी होतील असा दावा करून ते म्हणाले, शेखर इनामदार यांनी ‘पण’ ठेवून काम केले, त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी पूर्ण करून पक्षाला यश मिळव्tान दिले आहे. जिद्द आणि प्रयत्नामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे इनामदार यांचे राज्यातील महत्त्व वाढले असून पक्ष त्यांची नीट दखल घेईल. त्यांना मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नेवून सत्कार केला जाईल. मनपा निवडणुकीत सर्व बाजूंनी अडचणी आणल्या मात्र गणरायाच्या आशीर्वादाने आणि प्रयत्नामुळे यश मिळाले. यावरून आता केरळ आणि पश्चिम बंगलच्या निवडणुकीत आम्हाला कोणतीच अडचण येणार नसल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला. जयंत पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ते भाजपा वाढत असल्याची चिंता करतात. पण जोपर्यंत शेखर इनामदार सारखे ते कार्यकर्ते निर्माण करणार नाहीत तोपर्यंत ते नेता बनणार नाहीत.

सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शेखर इनामदार आणि कार्यकर्त्यांमुळे मनपात भाजपाची सत्ता आली असून आता आपली जबाबदारी वाढली आहे. लोकांनी टाकलेला विश्वासाला पात्र राहून डेनेज, पाणी, वीज या नागरी सुविधा देण्यावर भर द्यावा. शेखर इनामदार म्हणाले, महाआघाडीच्या काळात भाजपाचा पराभव झाला. त्यावेळी मनपात भाजपाची सत्ता आणण्याचे पण केले होते. ते पूर्ण झाले आहे. कार्यकर्त्यांमुळे यश  मिळाले आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून काम केले जाईल. आगामी काळात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असून पाच हजार मुस्लीम कार्यकर्त्यांसह अनेजणांचा पक्ष प्रवेश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, दिनकर पाटील आदींनी शेखर इनामदार यांच्यावर भाषणात स्तुती सुमने उधळली. यावेळी पद्माळे येथील ग्रामपंचायत सदस्यांसह काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.