|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रेमी युगलांना लूटणारी टोळी गजाआड

प्रेमी युगलांना लूटणारी टोळी गजाआड 

प्रतिनिधी/ सातारा

कास पठार, कण्हेर धरण तसेच खटाव तालुक्यातील गणपतीचा माळ परिसरात प्रेमी युगलांना लूटणारी आणि घरफोडी, मोटार सायकली, विहिरीवरील पाण्याच्या मोटारी चोरणाऱया टोळीला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने खटाव ता. विसापूर फाटा येथे सापळा रचून दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला गजाआड केले आहे. आरोपींनी घरफोडी, लूटमार, मोटार सायकल, पाण्याच्या मोटारी अशा एकूण 25 गुह्यांची कबुली दिली आहे. लुटमारीतील मौल्यवान वस्तू व दागीने जप्त करण्यात आल्या आहेत. घरफोडी, मोटार सायकल चोरीचा ऐवज हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे. 

  याबाबतची माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.नि. पदद्माकर घनवट यांना खबऱयाकडून माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील मालमत्तेच्या गुह्यातील आरोपी व त्यांचे चार साथीदार दोन मोटार सायकलव सातारा ते पुसेगाव रस्त्यावरील विसापूर फाटय़ावर येणार आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो. उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड, शशिकांत मुसळे यांनी सहकारी कर्मचाऱयांसह विसापूर फाटय़ावर सापळा रचून दबा धरून बसले होते. त्यावेळी संशयीत रित्या दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या पाच युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी 25 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या पाच आरोपींनी कास पठार, कण्हेर धरण आणि गणपतीचा माळ या परिसरात 9 प्रेमीयुगलांना लुटल्याची कबुली दिली आहे. तसेच घरफोडीचे 3 गुन्हे, नेर, डिस्कळ ता. खटाव, आंद्रुड ता. फलटण आणि स्वारगेट पुणे या ठिकाणावरून चार पल्सर मोटार सायकली व एक स्प्लेंडर अशा एकूण 5 मोटार सायकली चोरीची कबुली दिली आहे. खटाव तालुक्यातील नेर, बुध, विसापूर, बुधालेवाडी या ठिकाणावरून विहिरीतील 6 मोटारींची कबुली दिली आहे. या सराईत टोळीच्या नावावर लुटमार, दरोडा, घरफोडी, मोटारसायकल आणि इलेक्ट्रिक मोटारीचे असे एकूण 25 गुन्हे उघडकीस आले आहेत. आणखी काही मालमत्तेचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गुह्यातील ऐवज हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी किरण बाळू बुधावले वय 23, सतीश देवबा बुधावले वय 19, अक्षय लक्षण बुधावले वय 19, बाळू अंकुश बुधावले वय 20, चौघे रा. बुधावलेवाडी, ता. खटाव, सातारा, अजय श्रीरंग जाधव वय 27 रा. चिंचणी ता. खटाव या पाच जणांना अटक करण्यात यश आले आहे.

दरम्यान, ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या सूचनेनुसार सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो. नि. पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड, शशिकांत मुसळे, सहा. फौ. सुरेंद्र पानसांडे, विजय जाधव, मोहन घोरपडे, विजय शिर्के, तानाजी माने, कांतीलाल नवघणे, रामा गुरव, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबळे, प्रवीण फडतरे, नितीन गोगावले, नीलेश काटकर, अर्जुन शिरतोडे, विक्रम पिसाळ, मोहसीन मोमीन, प्रमोद सावंत, चालक संजय जाधव, विजय सावंत, गणेश कचरे यांनी कारवाई केली आहे.