|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बार्देश तालुक्यातील विकासकामांसाठी 140 कोटी मंजूर

बार्देश तालुक्यातील विकासकामांसाठी 140 कोटी मंजूर 

प्रतिनिधी/ म्हापसा

विकासकामांच्या दृष्टीकोनातून आणि सुशोभिकरणासाठी बार्देश तालुक्यासाठी सरकारने 2018-19 वर्षासाठी 140 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याशिवाय बार्देश तालुक्यात पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी या खात्यातर्फे 121 कोटी रुपयांची कामे वर्षभरात हाती घेतली जाणार आहेत. तालुक्यात 24 तास पाणी पुरवठा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 2019 पर्यंत बार्देश तालुक्यातील प्रत्येक मतदारसंघात अतिरिक्त 5 एमएलडी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी व्यासपीठावर हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो, नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, उपनगराध्यक्ष मर्लिन डिसोझा, मुख्याधिकारी क्लेन मदेरा, मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, जलस्रोत खात्याचे अभियंता व प्रिन्सिपल अभियंता वेर्लेकर आदी उपस्थित होते.

15 नोव्हेंबरपासून राज्यात हॉटमिक्स कामांचा शुभारंभ

राज्यात सर्वत्र हॉटमिक्स कामाचा शुभारंभ येत्या 15 नोव्हेंबरपासून होणार आहे. ज्या काही फाईल्स अद्याप पेडिंग आहेत त्या सर्व सरकारी फाईल्स 15 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्यात येतील. उरलेली महत्त्वाची कामे 2019 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यात राज्यात बांधण्यात येणाऱया पुलांचा सामावेश असल्याची माहिती मंत्री ढवळीकर यांनी दिली. विरोधकांनी नाहक विचलित होऊन आरोप करण्यापेक्षा राज्यात होणारी विकासकामे पहावीत. त्याबाबत सकारात्मक दृष्टीने पहावे, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला.

बार्देश तालुक्यातील रस्ते आणि विकास पाणी, वीज समस्या याबाबत म्हापशात बोलणे गरजेचे आहे. राज्यात आज सर्वत्र मलनिस्सारण प्रकल्प सुरू होत आहेत. 2008 मध्ये या प्रकल्पास सुरूवात झाली होती. नंतर हे काम बंद पडले. 2012 साली हे काम परत आपण सुरू केले. काही पत्रकारांनी याबाबत टीका केली. त्यांनी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.

बार्देश तालुक्यातसाठी 140 कोटी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली बार्देश तालुक्यातील विकासकामांसाठी 140 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यात हळदोणा 19 कोटी, पर्वरी 28 कोटी, म्हापसा 14 कोटी, शिवोली 41 कोटी, साळगाव 23 कोटी, कळंगूट 31 कोटी, थिवी 14 कोटी अशा निधीचा सामावेश आहे. महसूल अंतर्गत 5 कोटी 80 लाखाची कामे हाती घेतली आहेत. स्पीड ओव्हरलोडअंतर्गत 2018-19 साठी दहा कोटीची कामे हाती घेण्यात येतील, असे ते म्हणाले.

म्हापसा शहर सुशोभिकरणासाठी 24 कोटी

म्हापसा शहर सुशोभिकरणासाठी 24 कोटीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. येत्या 15 नोव्हेंबर रोजी म्हापसा शहरात हॉटमिक्स कामाचा शुभारंभ होणार आहे. इतर मतदारसंघातही 15 नोव्हेंबरपासून कामाला सुरूवात होणार आहे. आज म्हापसा शहराकडे पाहताना मलनिस्सारण प्रकल्पाकडे पाहणे अधिक गरजेचे वाटते. यासाठी नगरसेवकांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन या प्रकल्पाबद्दलची माहिती घरोघरी देणे गरजेचे आहे. मलनिस्सारण प्रकल्पासाठी 100 कोटी वेगळे मंजूर करण्यात आले आहेत, असे ढवळीकर म्हणाले.

म्हापशाला मलनिस्सारण प्रकल्पाची नितांत गरज

पुढील 35 वर्षानंतर म्हापशाची अवस्था काय असेल याचा विचार करता म्हापशात मलनिस्सारण प्रकल्पाची नितांत गरज आहे. यासाठी 6.5 व्होडींग प्रकल्प कार्यान्वित करायचा आहे. जी कनेक्शने जुळवाजुळव करायची आहे ती येत्या महिन्याभरात सुरू होणार आहेत. यासाठी पालिकेचे सहकार्य अत्यावश्यक आहे. याअंतर्गत 5 हजार कनेक्शने देण्यात येणार आहेत. सर्व नगरसेवकांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.

मलनिस्सारणासाठी 15 एमएलडी प्रकल्प

मलनिस्सारणसाठी 15 एमएलडी नवीन प्रकल्प बांधण्यात येणार आहे. मुख्य पाईपलाईनसाठी 24 कोटी रुपये नवीन मलनिस्सारण प्रकल्पासाठी प्राप्त होणार आहेत. हा मैला नष्ट केला जाणार आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यात काहीच शहानपणाचे नाही. या प्रकल्पाचे म्हापशातील काम सुमारे 35 टक्के पूर्ण झाले आहे.

2019 पर्यंत प्रत्येक मतदारसंघात अतिरिक्त 5 एमएलडी पाणी

2019 पर्यंत प्रत्येक मतदारसंघात अतिरिक्त 5 एमएलडी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बार्देश तालुक्यात एकूण 110 एमएलडी पाणी येते. साळगाव, म्हापशात 23 व 18, हळदोणा 17, शिवोली 13, साळगाव 15 असे त्याचे वितरण होते. सणाच्या दिवसात अतिरिक्त पाणी द्यावे लागते. यासाठी सरकारने योजना आखल्या आहेत. सरकारचा 24 तास पाणी देण्याचा प्रयत्न आहे. हे कठीण आहे पण सरकार प्रयत्नशील आहे. म्हापशात पूर्वी 3 तास पाणी यायचे आता 8 तास पाणी येते.

पाणी पुरवठासाठी 121 कोटीचे कामे

बार्देश तालुक्यात 121 कोटी रुपयांची कामे फक्त पाणी पुरवठा खात्यासाठी हाती घेण्यात आली आहेत. सगळय़ात मोठे काम 6500 क्युबीक मीटर अस्नोडा प्रकल्पात होणार आहे. ते काम 8 कोटीचे आहे. आस्नोडा ते म्हापसा अशी मुख्य पाईपलाईन 40 कोटी खर्चाची आहे. 50 एमएलडी पर्वरीसाठी 25 कोटी, 20 एमएलडी प्रकल्प गिरीसाठी 43 कोटी आणि 5 एमएलडी प्रकल्प हणजुणसाठी 5 कोटी असे 121 कोटीची कामे 2021 मध्ये पूर्ण होणार आहे.

नाहक विरोध नको, विकास पण बघा

2019 डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होणार आहेत. राष्ट्रीय महामार्गाची कामे राज्यात जोरात सुरू आहेत. अस्वस्थ झालेले काही काँग्रेसजण लोकांचे मन विचलित करत आहेत. आम्ही काय कामे करतो याकडे पहा. आज तिसरा मांडवी पूल उभा राहत आहे. हे सरकार लोकांचे आहे. आम्ही विकासकामे करताना तोडफोड करत नाही. मांडवी पुलाचे उद्घाटन डिसेंबरअखेरीस होणार आहे. खाणेपाट, गालजीबाद, माशेलचे मार्च मध्ये उद्घाटन होणार आहे. करासवाडा ते पत्रादेवी मार्गाचे काम जोरात सुरू आहे. नाहक विरोध करू नका. कामे पूर्ण होईपर्यंत वाट पहा, तुमचे प्रश्न असतील तर ते आमच्याकडे मांडा. राज्यात 105 किलोमीटरचे राष्ट्रीयीकरण होत आहे.

पावसामुळेच रस्त्यांवर चर, सरकारचे दुर्लक्ष नाही

गोव्यात 100 इंच पाऊस पडतो. त्यामुळे पावसात काम करणे कठीण होते. जेणेकरून पावसात रस्त्यावर चर पडतात. आमचा प्रयत्न सर्व काही चांगले करण्याचा आहे. डांबरीकरण, चर पडणे आदीची नोंद घेण्यासाठी खास अभियंत्याची नियुक्ती केलेली आहे. ते आमच्यापर्यंत लेखी अहवाल देतात. आमचेही त्यांच्यावर लक्ष असते. तार रस्ता करण्यास 20 कोटी खर्च येतो, मात्र काँक्रिटीकरण करण्यास 20 पटीने म्हणजे 200 कोटीचा खर्च येतो. एवढा खर्च करणे सरकारला शक्य नाही, असे ते म्हणाले.

म्हापशाला नवीन पाईपलाईनची गरज

म्हापशात अधिक जोड कनेक्शन असल्याने पाणी पुरवठा कमी होते. 23 एमएलडीची आवश्यकता असली तरी आता 14 एमएलडी पापी येते. याचे कारण आता जुने पाईपलाईन व अतिरिक्त जोड कनेक्शने असू शकतात. यासाठी नवीन पाईपलाईन घालणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेही लक्ष देऊ, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

Related posts: