|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चवथीची परब न्यारी सजली गोमंत नगरी…

चवथीची परब न्यारी सजली गोमंत नगरी… 

प्रतिनिधी/ पणजी

विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झाला असून गणरायाच्या आगमनाची लोक आतुरनेते वाट पाहत आहेत. गुरुवारी सकाळी घरोघरी गणरायाचे आगमन होणार असून संपूर्ण गोवा गणरायाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. लांबच्या पल्ल्यांच्या गणरायाचे आगमन आदल्या दिवशी होते. त्यामुळे आज बुधवारीच काही भक्तांच्या घरी गणरायाचे आगमन होणार आहे.

संपूर्ण गोव्यात चतुर्थीचे उत्सवी वातावरण आहे. सार्वजनिक मंडळे गणरायाच्या स्वागताची तयारी पूर्ण करुन सज्ज झाली आहेत. घरगुती सजावटीवर अंतिम हात फिरविण्याचे काम सुरु आहे. बाजारपेठा गजबजल्या असून माटोळी साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या माटोळी साहित्याने बाजारात गर्दी केली आहे. रात्री उशिरापर्यंत बाजारातून या साहित्याची खरेदी विक्री सुरु होती.

गणेशमूर्ती चित्रशाळाही झाल्या सज्ज

गणेशमूर्तीच्या चित्रशाळाही आता गणेशमूर्ती सुशोभित करुन सज्ज आहेत. चित्रशाळामधून उशिरा मध्यारात्रीपर्यंत चालणारे काम आता थांबले आहे. अंतिम हात फिरवून मूर्ती सज्ज ठेवल्या आहेत. ग्रामीण भागात बहुतेक गावामध्ये गणेशमूर्तीच्या चित्रशाळा आहेत. अनेक कसबी कलाकार या मूर्ती रंगवतात व त्याला आकर्षक असे रुप देतात. या गणेशमूर्ती आता घरोघरी जाण्यासाठी सज्ज आहेत.

अकरा दिवसांपर्यंत गणेशोत्सव

गुरुवारी राज्यात चतुर्थी उत्सवाला सुरुवात होईल. राज्यात दीड दिवसापासून अकरा दिवसापर्यंत गणेशोत्सव चालतो. सार्वजनिक गणेश मंडळानी अकरा दिवसाच्या गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी केली असून लेझीम पथके, बॅडपथकाच्या साथीने गणरायाचे स्वागत केले जाणार आहे. त्याचबरोबर दर्जेदार मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.