|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गणरायांसह विमान आज चिपीत

गणरायांसह विमान आज चिपीत 

भूषण देसाई/ परुळे

 परुळे-चिपी माळरानावर साकारलेल्या सिंधुदुर्ग (चिपी-परुळे) एअरपोर्टवर बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विमानतळाची चाचणी करणारे पहिले चाचणी विमान गणेश मूर्तीसह लँडींग करणार आहे. चिपी विमानतळावर विमानाने उतरणारा ‘पहिला प्रवासी’ सिंधुदुर्गवासीयांचा लाडका श्री गणरायाच ठरणार आहे.

 नॅशनल एअरपोर्ट ऍथॉरिटी व आयआरबी कंपनीने लँडींग होणाऱया विमानाची व गणरायाच्या स्वागताची तयारी केली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. विमानतळावरून डिसेंबरपर्यंत प्रवासी वाहतूक सुरू होणार, असे सांगितले जात आहे. गेली काही वर्षे प्रतीक्षेत असलेली विमानतळाची अंतर्गत चाचणी बुधवारी होणार असल्याने भूमिपुत्रांना ती आनंदाचीच पर्वणी ठरणार आहे.

 आतापर्यंत या धावपट्टीवर कंपनी तसेच केंद्रीय उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांचे हेलिकॉप्टर उतरले आहे. मात्र, विमान उतरले नव्हते. धावपट्टीवर उतरून नंतर तसेच रनवे करीत थांबणारे विमान सिंधुदुर्गवासीयांना कायमचे पाहायचे आहे. काही महिने त्यासाठी थांबावे लागेल. पण पहिले विमान लँडींग होण्याच्या क्षणाचे अनेकजण साक्षीदार होणार आहेत. ज्या भूमिपुत्र शेतकऱयांनी आपल्या जमिनी कवडीमोलाने या प्रकल्पासाठी दिल्या. तसेच गेली पाच वर्षे विमानतळ साकारण्यासाठी अहोरात्र काम करणारे कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व कामगारांच्या दृष्टीने विमानतळाचे लँडींग महत्वाचे ठरणार आहे. त्यांना आनंद देणारे ठरणार आहे.

                  अनेकांचे प्रयत्न लागले सत्कारणी

 सुरुवातीला म्हापण येथे माळरानावर विमानतळ होऊ घातला होता. तत्कालीन खासदार मेजर सुधीर सावंत यांनी नॅशनल एअरपोर्टच्या अधिकाऱयांना आणून सर्व्हे केला. विमानतळ तिथेच होणार हे जवळ-जवळ निश्चित झाले होते. मात्र, तेथील काही शेतकऱयांनी विरोध केला. त्यांना काही राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळाले आणि त्यानंतर तो प्रस्ताव बारगळला. त्यानंतर खानोली येथील माळरानाची पाहणी करण्यात आली. पण ती योग्य जागा नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. त्यानंतर सुधीर सावंत यांनी परुळे-चिपी माळरानावरील जागा सुचविली. प्रत्यक्ष सर्व्हेही करण्यात आला आणि चिपीत विमानतळ होणार हे निश्चित झाले.

 गोव्यातील विमानतळ लष्करी विमानांसाठी वापरण्यात येतो. त्या कालावधीत प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागते. त्याला पर्याय म्हणून सुधीर सावंत यांनी केंद्रातील आपल्या वजनामुळे परुळेच्या विमानतळावर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, सुरेश प्रभू, विद्यमान खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर तसेच सर्वच राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी या सर्वांचे प्रयत्न सत्कारणी लागले आहेत.