|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘राफेल’मुळे युद्धक्षमतेत भर

‘राफेल’मुळे युद्धक्षमतेत भर 

वायूदल प्रमुखांची ग्वाही : एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणा महत्त्वाची ठरणार, चीन-पाकचे आव्हान समोर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला विरोधकांच्या टीकेस तोंड द्यावे लागत असताना वायूदलाने मात्र या व्यवहाराचे समर्थन केले आहे. वायूदल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी ही विमाने अत्यावश्यक असल्याचे सांगत देशाच्या हवाई सीमांसाठी ती महत्त्वाची असल्याचे विधान केले. तसेच त्यांनी चीन आणि पाकिस्तानचा उल्लेख करत राफेल देशासाठी आवश्यक असल्याचे म्हटले.

भारताची स्थिती वेगळी असून आमचे शेजारी अण्वस्त्रसज्ज आहेत. तसेच स्वतःच्या विमानांचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राफेलच्या माध्यमातून आम्ही या समस्यांना तोंड देऊ शकू, असे धनोआ म्हणाले. वायूदलाचे उपप्रमुख एस.बी. देव यांनी देखील काही दिवसांपूर्वी या कराराचे जाहीर समर्थन केले होते. या करारावर टीका करणाऱयांना याची मानके आणि खरेदी प्रक्रिया जाणून घ्यावी, असे त्यांनी म्हटले होते.

वायूदल सामर्थ्यवान होतेय

राफेल आणि एस-400 च्या माध्यमातून सरकार वायूदलाला सामर्थ्यवान करण्याचे काम करत आहे. 42 स्क्वॉड्रनच्या तुलनेत भारतीय वायूदलाकडे केवळ सध्या 31 स्क्वॉड्रन्स आहेत. 42 संख्या देखील पुरेशी ठरणारी नाही. मागील एक दशकात चीनने भारताला लागून असलेल्या भागात रस्ते, पूल, रेल्वे आणि धावपट्टय़ांचा वेगाने विस्तार केल्याचे धनोआ यांनी सांगितले.

चीनकडे नव्या पिढीची विमाने

चीनजवळ सुमारे 1700 लढाऊ विमाने असून यातील 800 विमाने नव्या पिढीची आहेत. त्यांचा वापर भारताच्या विरोधात होऊ शकतो. चीनकडे पुरेशा प्रमाणात लढाऊ विमाने आहेत. पाकिस्तानने देखील एफ-16 विमानांचा ताफा अद्ययावत केला आहे. तसेच चौथ्या आणि पाचव्या पिढीच्या विमानांमध्ये तो सुधारणा करत आहे. पाक जेएफ-17 विमान सामील करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

भारताने सज्ज राहणे गरजेचे

आमच्या शेजाऱयांनी दुसऱया तसेच तिसऱया पिढीच्या विमानांना चौथ्या तसेच पाचव्या पिढीच्या विमानांनी बदलले आहे. यामुळे भारताला देखील स्वतःच्या विमानांमध्ये सुधारणा घडवून आणावी लागेल. आम्हाला कोणत्याही प्रकारची संघर्षाची स्थिती रोखण्यासाठी पूर्ण तयारी करावी लागणार आहे. दोन आघाडय़ांवर लढावे लागल्यास देखील आम्हाला सज्ज रहावे लागेल असे ते म्हणाले.

राफेल आवश्यकच

राफेल सारख्या अत्याधुनिक विमानाची भारताला आवश्यकता आहे. तेजस एकटाच आव्हानांना सामोरा जाऊ शकत नाही. शत्रूंच्या तुलनेत देशाला बळकट व्हावे लागणार आहे. भारतासारख्या अवघड स्थितीला कोणताच देश तोंड देत नाही. विरोधी देशांच्या वृत्तीत किंचिंत बदल देखील एका रात्रीत स्थिती पालटवू शकतो असा इशारा त्यांनी दिला.

चीनकडून तीनवेळा घुसखोरी

?चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने ऑगस्ट महिन्यात भारतीय सीमेत तीनेवळा घुसखोरी केली आहे. चिनी सैनिक उत्तराखंडच्या चमोली जिल्हय़ातील बाराहोती येथून भारतीय सीमेत दाखल झाले तसेच 4 किलोमीटर अंतरापर्यंत आत शिरले होते. बाराहोती चौकीवर आयटीबीपीचे जवान शस्त्रांशिवाय गस्त घालत असतात.

?1958 मध्ये भारत आणि चीनने बारहोती क्षेत्रात कोणताही सैनिक पाठविणार नसल्याचा निर्णय घेतला होता. 2000 साली तीन चौक्यांवर आयटीबीपीचे जवान शस्त्रांशिवाय तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हे जवान गणवेश न परिधान करता सामान्य वेशात कार्यरत असतात.

?ऑगस्टच्या प्रारंभी चिनी सैनिकांचे एक पथक लडाखच्या डेमचोकमधून भारतीय हद्दीत सुमारे 400 मीटर अंतरापर्यंत चेरदाँग-नेरलाँगपर्यंत शिरले, तेथे त्यांनी 5 तंबू उभारले होते. या प्रकरणी दोन्ही देशांदरम्यान ब्रिगेडियर स्तरीय चर्चा झाली, भारताने आक्षेप नेंदविल्यानंतर चीनने 4 तंबू हटविले होते.

Related posts: