|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तलाठयाचा खासगी उमेदवार लाचलुचपतच्या जाळयात

तलाठयाचा खासगी उमेदवार लाचलुचपतच्या जाळयात 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

   जमिनीच्या सातबारा उताऱयावर नाव लावून देण्यासाठी तक्रारदाराकडून 9 हजार रूपयांची लाच स्वीकारताना चंदूर येथील तलाठय़ाचा खासगी उमेदवार सुधीर दत्ता पाटील (वय 44, रा. सुतार गल्ली, चंदूर ता. हातकणंगले) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

    याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी,  तक्रारदार यांनी 1988 साली चंदूर, ता. हातकणंगले येथील गट क्रमांक 405 मधील अर्धा गुंठा जागा खरेदी केली होती. या जमिनीच्या सातबारा पत्रकी नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी नाव खरेदी दस्ताची कागदपत्रे तलाठी निलेश चौगुले यांना एक वर्षापूर्वी दिली होती. सातबारा उतारा मिळत नसल्याने तक्रारदाराने तलाठय़ाचा खासगी उमेदवार सुधीर पाटील याची भेट घेतली. त्याने सातबारा उतारा देण्यासाठी 15 हजार रूपयांची मागणी केली. यावेळी तक्रारदाराने 5 हजार रूपये दिले. त्यांनर पाटील याने राहिलेले 10 हजार रूपये सातबारा उतारा दिल्यानंतर देण्यास सांगितले. अनेक दिवस होवूनही सातबारा उतारा मिळत नसल्याने तक्रारदारांने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर यांच्याकडे तलाठी निलेश चौगले व खासगी उमेदवार सुधीर पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी चंदूर येथील तलाठी कार्यालयाजवळ सापळा रचला. यावेळी सुधीर पाटील याला बसवेश्वर कार्यालयाच्या समोर तक्रारदाराकडून 9 हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटील याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.