|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विधानसभा विसर्जित प्रस्तावाला राज्यपालांनी विरोध करावा

विधानसभा विसर्जित प्रस्तावाला राज्यपालांनी विरोध करावा 

प्रतिनिधी/ पणजी

 मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विधानसभा विसर्जित करण्याची शक्यता असून लोकसभा निवडणुकीबरोबरच गोव्यातील विधानसभा निवडणुका घेण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव आल्यास राज्यपालांनी विरोध करावा, अशी मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडकर यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. विधानसभा बरखास्त करुन स्वतःच्या काळजीवाहू सरकारच्या नेतृत्वाखाली निवडणुका घेण्याची तयारी पर्रीकर यांनी चालविली असल्याचा आरोपही यावेळी त्यांना केला.

काँग्रेस पक्षाला संधी द्यावी

सध्या मुख्यमंत्री आजारी असल्याने प्रशासकीय काम ठप्प झाले आहे. जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. गोव्यातील जनतेला आता चांगल्या व बळकट सरकारची गरज असून त्यासाठी भाजपने आता पायउतार होऊन कॉंग्रेस पक्षाला सरकार स्थापन  करण्याची संधी द्यावी. राज्यपालांना कायद्यानुसार मोठय़ा राजकीय पक्षाला ही संधी द्यावी. गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने 40 पैकी 18 काँग्रेसचे आमदार निवडून काँग्रेसवर विश्वास ठेवला पण भाजपने 12 आमदार निवडून येऊनही बळजबरीने आपले सरकार स्थापन केले आहे. पण आता हे सरकार दीड वर्षांत कोलमोडले आहे

राज्यपालांनी गोव्याच्या जनतेवर पुन्हा निवडणुका लादू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांना विश्रांतीची गरज 

या अगोदरही भाजने सरकार अस्थिर झाल्यावर कुठल्याच युती पक्षाच्या मंत्र्यांना विश्वासात न घेता राज्यपालाकडे विधानसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. आताही असाच प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. सध्या मुख्यमंत्री आजारी असल्याने त्यांना विश्रांतीची गरज आहे. पण मुख्यमंत्री त्या पदाला चिकटून बसले sअसून ते हट्टापायी हे पद सोडण्यास तयार नाही. त्यामुळे आज राज्यातील प्रशासकीय काम कोलमडले आहे, असा आरोपही यावेळी चोडणकर यांनी केला.

फॉर्मेलिन विरोधात रस्त्यावर उतरणार

 राज्यात सध्या फॉर्मेलिनचा विषय गाजत असून अजूनही सरकार या विषयी गंभीर दिसत नाही. मोठय़ा मत्स्य दलालांच्या हितासाठी अजूनही मोठय़ा प्रमाणात परराज्यातील मासळी येत आहे त्याची योग्य तपासणी होत नाही. सरकारने एकतर परराज्यातील मासळी बंद करावी किंवा सर्व मासळीची कायदेशीर तपासणी करावी. पोलीस संरक्षण घेऊन परराज्यातील मासळी आणली जात आहे. सरकार हुकूमशाहीने वागत आहे. या विरोधात आम्ही चतुर्थीनंतर आंदोलन व उपोषण करणार, असे  यावेळी चोडणकर यांनी सांगितले.

सहकार क्षेत्र कोलमोडले

भाजप सरकारने राज्यातील सहकार चळवळ पूर्णपणे नष्ट केली आहे. आज अनेक सहकारी बॅंकांना समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या बॅंकचा समस्या सोडविण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने आपल्या हिताचे पाहिले आहे पण त्या बँकामध्ये काम करणारे लोक ती उभी करण्यासाठी केलेले परिश्रम याची सरकारने कदर केलेली नाही. त्यामुळे आज सहकार क्षेत्र कोलमडले आहे, असा आरोपही यावेळी श्री. चोडणकर यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे ऊर्फान मुल्ला व इतर सदस्य उपस्थित होते.