|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाप्पांच्या आगमनासाठी शहर सज्ज

बाप्पांच्या आगमनासाठी शहर सज्ज 

अवघ्या शहर परिसरात चैतन्यदायी वातावरण :

प्रतिनिधी / बेळगाव

आतुरतेने ज्यांची वर्षभर वाट पाहिली त्या गणरायांचे आगमन गुरुवारी शहरात होत आहे. त्यामुळे अवघ्या शहर परिसरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले असून अवघे शहर गणरायांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

गणपती बाप्पांचे आगमन गुरुवारी होणार असल्याने स्वागताची तयारी गतिमान झाली आहे. घरगुती श्रीमूर्ती नेण्यासाठी काही भक्तांची बुधवारीच लगबग सुरू होती. गणेशभक्तांच्या उत्साहाला आलेला महापूर बाजारपेठेत गर्दीच्या रुपाने अवतरला होता. शहरामध्ये गणेशाच्या आगमनासाठी मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भक्तगणांचा उत्साह दुणावला आहे. विघ्नहर्ता गणराया दहा दिवसांसाठी मुक्कामाला येणार असल्याने भक्तगणांची आतुरता शिगेला पोहोचली आहे.

भरगर्दीमध्ये बाजारपेठेत येऊन आवश्यक साहित्य खरेदी करण्याबरोबरच घरगुती श्रीमूर्ती नेण्यासाठी देखील भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याचबरोबर काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्ती मिरवणुकीने मंडपात नेण्यात आल्या. त्यामुळे गणरायांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी अवघे शहर सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.

गणेश चतुर्थीपूर्वीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आगमन सोहळा मिरवणूक काढण्यात आली. यावर्षी अनेक गणेशोत्सव मंडळांनी असे आगमन सोहळे केले. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाही अनेक मंडळांनी ढोल-ताशांचा गजर करत मोठय़ा उत्साहात मिरवणुका काढल्या.

जुने बेळगाव येथील गणेशोत्सव मंडळ, काकतीवेस येथील गणेशोत्सव मंडळ, नानावाडी येथील गणेशोत्सव मंडळ यासह अनेक मंडळांनी बुधवारी आगमन सोहळा मिरवणुका काढल्या. धर्मवीर संभाजी चौक तसेच इतर परिसरातून या भव्य-दिव्य व नेत्रदीपक मिरवणुका काढण्यात आल्या. एकाच रंगाचे पोषाख व डोक्मयावर असणारा भगवा फेटा यामुळे सर्व वातावरण भक्तीमय बनले होते.

ढोल-ताशांच्या गजराने लक्ष वेधले

गणेश चतुर्थी दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी घरगुती गणेशमूर्ते बरोबरच सार्वजनिक गणेशमूर्ती मंडळे घेऊन जात होते. यावषी सुवर्ण महोत्सव असलेल्या काही मंडळांनी भव्य आगमन सोहळा मिरवणूक काढल्या. यामध्ये ढोल-ताशांचा पारंपरिक गजर करण्यात आला. बेळगावच्या वादकांनी मुंबई-पुणेप्रमाणेच या ढोल-ताशांचा गजर करून अनेकांचे लक्ष वेधून घेतले.