|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अदृश्य कागद

अदृश्य कागद 

गेल्या पिढीतले एक प्राध्यापक आणि समीक्षक स. शि. भावे यांची एक आठवण आहे. ऐंशीच्या दशकात काही काळ ते आपल्या छोटय़ाशा घरात एकटेच रहात होते. बरोबर कोणी नातेवाईक नव्हते.

त्या दिवसात एकदा त्यांनी मला टेलीफोन खात्यातून नव्या टेलीफोनसाठी लागणारा अर्जाचा नमुना आणायला सांगितला. मी टेलीफोन कचेरीत जाऊन तो अर्ज विकत आणला. किंमत वीस रुपये होती. संध्याकाळी त्यांना तो द्यायला गेलो. त्यांनी अर्जाची किंमत विचारली. मी सांगितल्यावर टेबलच्या खणातून वीस रुपये काढून दिले. नंतर त्यांनी भिंतीवरील कॅलेंडरशेजारी डकवलेल्या कागदावर नोंद केली. कुतूहलाने मी विचारले तेव्हा ते म्हणाले, मी घरात एकटाच राहतो. लोकांना देणे असलेल्या किंवा त्यांच्याकडून येणे असलेल्या गोष्टींची या कागदावर नोंद करून ठेवतो. व्यवहार मिटले की हा जुना कागद काढून तिथे नवा कागद डकवतो. अचानक मला काही झाले तर माझ्या पश्चात माझ्या देण्याघेण्यांची अचूक नोंद रहावी हा हेतू आहे.   

एरव्ही घरात अधिक माणसे असतील तेव्हा आपण परस्परांना आपले व्यवहार विश्वासाने सांगून ठेवत असतोच. महत्त्वाचे व्यवहार असतील तर त्याचे कागदपत्र बँकेच्या लॉकरमध्ये ठेवून त्याची किल्ली कुटुंबातील प्रमुख व्यक्तींना ठाऊक असेल अशा जागी ठेवलेली असते. पण या भिंतीवरच्या कागदाची तिला सर नाही.

या कागदाची आठवण एका अगदी वेगळय़ा निमित्ताने झाली.

गेल्या आठवडय़ात आमच्या धाकटय़ा मुलाचे लग्न झाले. लग्न होऊन मुलगा आणि सून त्यांच्या नव्या घरी रहायला गेले. मुलगी यापूर्वीच सासरी रहायला गेली आहे. आता घरात आम्ही दोघेच उरलो आहोत. घरातले हे शेवटचे कार्य संपन्न झाल्यावर त्या रात्री मनात विचार आला की, बस्स. आता सगळे भावनिक ताणतणाव सरले. आता घरात नव्याने कार्य नाही म्हणजे आमंत्रणे नाहीत, अभ्यागतांचे रुसवेफुगवे काढण्याची, मानपान संभाळण्याची पीडा नाही. आता भेटवस्तू घेणे-देणे किंवा कुठलीच औपचारिकता नाही. 

पण आमच्या मनाच्या भिंतींवर एक अदृश्य कागद आहे. खऱया आप्तेष्टांनी, जिवलग सुहृदांनी आजवर जे निरपेक्ष प्रेम दिले त्या प्रेमाची त्यावर नोंद आहे. त्या नोंदी पुसण्याची इच्छा नाही. इथून केव्हातरी जाऊ तेव्हा आमच्या मनाच्या भिंतींवर तो अदृश्य कागद साऱया नोंदींसह फडकत राहो.