|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दोन ब्रिटीश उपग्रह झेपावले अंतराळात

दोन ब्रिटीश उपग्रह झेपावले अंतराळात 

पीएसएलव्ही-सी42’चे यशस्वी उड्डाण

श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था

श्रीहरिकोटा येथून रविवारी दोन ब्रिटीश उपग्रहांचे यशस्वी उड्डाण झाले. ‘नोवा एसएआर’ आणि ‘एस1-4’ अशी उपग्रहांची नावे असून त्यांचे एकूण वजन 800 किलोग्रॅम असल्याची माहिती इस्रोच्या सूत्रांकडून देण्यात आली. ब्रिटनमधील सुरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेडकडून या उपग्रहांची निर्मिती करण्यात आली आहे. इस्त्रोच्या सहाय्याने करण्यात आलेले हे पहिलेच पूर्णतः व्यावसायिक परीक्षण असल्याचे इस्त्रोचे प्रमुख के. शिवन यांनी स्पष्ट केले.

पूर्वनियोजनानुसार रविवारी रात्री 10 वाजून 7 मिनिटांनी दोन्ही उपग्रहांचे पीएसएलव्ही-सी42 च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रह प्रक्षेपणाचे 33 तासांचे काऊंटडाऊन शनिवारी दुपारी 1 वाजून 8 मिनिटांनी सुरू झाले होते.  अंतराळात झेपावलेल्या उपग्रहांच्या माध्यमातून पर्यावरणीय बदल, वनांचे क्षेत्र, पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींचे निरीक्षण केले जाणार आहे. या उपग्रहांद्वारे मिळणाऱया माहितीच्या आधारे विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत.

पुढील 7 महिन्यात 19 मोहिमांचे उद्दिष्ट

इस्त्रो सप्टेंबर ते मार्च या सात महिन्यांच्या कालावधीत 19 मोहिमा राबविणार आहे. या मोहिमेंतर्गंतच ब्रिटनचे दोन उपग्रह अवकाशात पाठविण्यात आले आहेत. या उपग्रहांसोबत एकही भारतीय उपग्रह पाठविण्यात आला नसून केवळ दोन विदेशी उपग्रह अंतराळात सोडण्यात आले आहेत. पुढील काळात 10 क्षेपणास्त्र प्रक्षेपणासह 9 यान प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.